पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या थेट बोलण्याच्या पद्धतीसाठी चर्चेत असतात. मात्र, त्यांच्या भाषणातले विनोदी संदर्भही तितकेच चर्चेचा विषय ठरतात. असाच एक हलकाफुलका आणि मिश्किल टोमणा त्यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगावला.
कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले, “फडणवीसांनी कधी काळी ‘अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा’ यावर पुस्तक लिहिलं होतं. आता मी त्यांना सुचवणार आहे की त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ या नावाने एक पुस्तक लिहावं. मुंबईत गेल्यावर त्यांना खास सांगणार आहे.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित प्रेक्षकांत हशा पिकला.
‘मी पुन्हा येईन’ हे विधान 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांनी अनेक वेळा केलं होतं. निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यात भाजपाला अपयश आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर विरोधी बाकावर असताना फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य वारंवार वापरलं होतं. त्यामुळे हे विधान राजकारणात चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरलं.
अजित पवारांनी या विधानाचा संदर्भ घेत आपल्या खास शैलीत मिश्किल टिप्पणी करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.