नागपूर : राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात म्हाडाशी संबंधित आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.
बावनकुळे यांनी सांगितले की, कोराडी व खापरखेडा वीज प्रकल्पांमधील ठेका कामगारांसाठी ५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत किफायतशीर दरात दिली जाणार आहेत. त्यांनी यासोबतच कामठी शहरात २,५०० नवीन घरे बांधण्याचाही निर्णय घेतल्याचे जाहीर केले. तसेच भीलगाव व खैरी परिसरात ५ हजार घरांचे बांधकाम सुरु असून त्यापैकी ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर शहर व जिल्ह्यात ५,५०० तयार घरे पात्र नागरिकांना देण्यात येणार असून त्यांचे वितरण मुख्यमंत्री घरकुल योजनेअंतर्गत होईल.
हिसलॉप कॉलेजच्या जवळील म्हाडा इमारतीचे लवकरच पुनर्विकास करण्यात येणार असून, अतिक्रमण हटवण्याची आणि झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याची योजना राबवली जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त झोपडपट्ट्यांतील रहिवाशांची यादी तयार करत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीयांसाठी घर बांधण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री एकूण २० लाख घरांना मंजुरी देत आहेत, तर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आणखी १० लाख घरांची योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे एकूण ३० लाख घरांचे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बावनकुळे म्हणाले की, पुढील दोन वर्षांत राज्यात ही घरे उभारली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या पुढाकाराने हे मोठे पॅकेज महाराष्ट्रासाठी घेऊन आले असल्याचे त्यांनी नमूद केले.नागपूर जिल्ह्यात एकही खेतमजूर झोपडीत राहणार नाही. सर्वांना पक्की घरे मिळणार आहेत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.