मुंबई: राज्यातील कामकाज सांभाळतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बिहारमध्ये निवडणुकीचा माहोल चांगलाच तापलेला असताना, फडणवीस आता पक्षाच्या विजयासाठी मैदानात उतरतील.
स्टार प्रचारकांच्या यादीत फडणवीसांचं नाव-
भाजपाने बिहार निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समावेश केला गेला आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, स्मृती इराणी, हिमंता बिस्वा सरमा आदी वरिष्ठ नेत्यांची नावेही आहेत. आता फडणवीस बिहारमधील प्रचारसभांमध्ये सहभागी होत पक्षाच्या उमेदवारांसाठी जनसमर्थन गोळा करतील.
महाराष्ट्रातून दोन नेते मैदानात-
फडणवीसांसह विनोद तावडे यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांचा बिहारमधील प्रचारात भाजपाच्या विजयासाठी महत्त्वाचा वाटा राहणार आहे. पुढील काही दिवसांत फडणवीस पटना, गया, भागलपूर, मुजफ्फरपूर यांसारख्या ठिकाणी सभा आणि रॅलींना उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
राष्ट्रीय पातळीवर फडणवीसांचा प्रभाव वाढणार-
भाजपाने महाराष्ट्राच्या सीमांच्या पलीकडे फडणवीसांवर विश्वास दाखवल्याने त्यांची भूमिका आता राष्ट्रीय पातळीवर अधिक मजबूत होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये त्यांनी दाखवलेलं नेतृत्व आणि संघटन कौशल्य पाहता, बिहारमध्येही त्यांच्या प्रचाराचा भाजपाच्या विजयात निर्णायक प्रभाव पडू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
ह्या नव्या जबाबदारीमुळे फडणवीसांचा राजकीय प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, भाजपाच्या राष्ट्रीय धोरणनिर्मितीत अधिक महत्त्वाचा घटक म्हणून त्यांची ओळख पक्की होण्याची शक्यता आहे.