मुंबई: प्रकाशाचा, आनंदाचा आणि एकोप्याचा सण म्हणजे दिवाळी! या पाच दिवसीय उत्सवाची सुरुवात वसुबारसपासून होते. यंदा वसुबारसचा सण शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. आश्विन कृष्ण द्वादशीला साजरा होणारा हा दिवस दिवाळीचा शुभारंभ मानला जातो. ग्रामीण भागात शेतकरी आपल्या गायींची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात, तर शहरी भागात लोक वासराच्या मूर्तीला पूजन करून सणाची सुरुवात करतात. हिंदू धर्मात गायीला ‘गौमाता’ म्हणून पूजले जाते. तिच्यात कोटीदेवतांचा वास असल्याचे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने स्वतःला ‘गोपाल’ म्हटले आणि गायीच्या सेवेत आयुष्य व्यतीत करणारा राजा दिलीप हाही भक्तिभावाचा आदर्श मानला जातो. गायीपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र या पाच गोष्टींना पवित्र मानले जाते. त्यामुळे वसुबारस हा सण केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि पर्यावरणपूरक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी सावत्स धेनू म्हणजे वासरासह असलेल्या गायीची पूजा केली जाते.
घरात गायी नसेल तर वासराच्या मूर्तीची स्थापना करून तिची पूजा केली जाते. सकाळी लवकर उठून अंगणात सुंदर रांगोळी काढतात, गायीला स्नान घालून तिला फुलांनी सजवतात. गायीला पुरणपोळी, वरनभात आणि गूळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून ओवाळले जाते. काही ठिकाणी स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी पूजा करून उपवास संपवतात. वसुबारसच्या दिवशी गहू, मूग आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळले जाते. स्त्रिया संध्याकाळी दिवे लावून, तुळशीला नमस्कार करून दिवाळीचा शुभारंभ करतात.
या दिवसापासून घराघरात रांगोळी, फुलांची सजावट आणि दीपप्रज्वलन सुरू होते. या दिवशी केलेल्या गायीच्या पूजेने घरात लक्ष्मीचे आगमन होते, असा श्रद्धावानांचा दृढ विश्वास आहे. गायीची सेवा म्हणजे मातृसेवा मानली जाते, म्हणूनच वसुबारस हा दिवस स्त्रीशक्ती, मातृत्व आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. दिवाळीच्या प्रकाशमय पर्वाची ही सुरुवात आपल्याला निसर्ग, प्राणी आणि परंपरेप्रती कृतज्ञ राहण्याचा संदेश देते.