Published On : Tue, Jul 2nd, 2019

मुख्यमंत्र्यांनी केले विधानसभेत ऊर्जामंत्र्यांच्या कामाचे कौतुक

Advertisement

मुंबई: विदर्भ-मराठवाड्यातील कृषिपंपाचा बॅकलॉग पूर्ण करणे, घारापुरी येथे 70 वर्षात प्रथमच वीज पोहोचवणे व गडचिरोली जिल्ह्यातील तुमीरकसा या शेवटच्या गावात 70 वर्षात वीज पोहोचवल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत कौतुक करून अभिनंदन केले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

ऊर्जा विभागाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात विदर्भ-मराठवाड्यातील 5 लाखांपेक्षा अधीक कृषिपंपांना कनेक्शन देऊन बॅकलॉग दूर केला. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कृषिपंपाना कनेक्शन मिळाले.

मुंबईजवळील घारापुरी या बेटावर स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रथमच वीज पोहोचवण्याचे काम झाले, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. समुद्रात पाण्याच्या खालून 8 किमी पर्यंत केबल टाकून घारापुरी येथे वीज पोहोचवली गेली. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भागात असलेल्या तुमीरकसा या शेवटच्या गावात वीज पोहोचवली असा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला. मंत्र्यांच्या कार्याचा उल्लेख होणारे ऊर्जामंत्री बावनकुळे हे एकमेव मंत्री ठरले.