| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Feb 4th, 2018

  तुमसर शहराच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२५ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  भंडारा :- : वेगवेगळया योजनांच्या माध्यमातून शहरांचा विकास व्हावा, तिथे मूलभूत सुविधा निर्माण व्हाव्यात हे शासनाचे धोरण आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात तुमसर नगरपरिषदेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून शहराच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२५ कोटी रुपये उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

  तुमसर नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, तुमसर नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांची उपस्थिती होती.

  मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, तुमसर नगरपालिकेला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली. पण आजही मूलभूत सुविधा पूर्ण करु शकलो नाही. राज्याचे नियोजन करीत असताना शहराकडे मोठे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. शहराच्या विकासासाठी निधी देण्यात आला नाही. लोक गावांकडून शहरांकडे आले पण त्यांचा निवारा, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, आरोग्य , दिवाबत्ती, शिक्षण यासाठी ज्या व्यवस्था उभ्या करायला पाहिजे होत्या. त्या दुर्दैवाने आपण उभ्या करु शकलो नाही ही खंत व्यक्त करुन ते म्हणाले, देशात मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर जसे गावांकडे लक्ष देण्यात आले तसे शहरांकडे लक्ष देण्यात येत आहे. गरीब माणसाला रोजगार मिळाला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करुन देत असताना अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन शहरे चांगली झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

  पिण्याचे पाणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ही शहरातील महत्त्वाची कामे असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या शहरात ही कामे होतात ती शहरे विकसित मानली जातात. या तीन बाबींवर शहराचे आरोग्य अवलंबून आहे. आज गावात राहणाऱ्यापेक्षा शहरात राहणारा व्यक्ती आजारी पडतो. याला सांडपाणी, घनकचरा व यामधून निर्माण होणारे प्रदूषण कारणीभूत आहेत. यापूर्वी नगरपरिषदांना 2 ते 4 कोटी रुपये निधी देण्यात येत होता. आम्ही आता शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देणे सुरु केले आहे. विशेषत: हा निधी सांडपाणी, पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यात येत आहे. तुमसर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 50 कोटी रुपये आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी 75 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून लवकरच हा निधी नगरपालिकेला देण्यात येईल.

  यापूर्वी 30 कोटी रुपये शाळा बांधकामासाठी देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नगरपालिकेनी शाळेत ई-लर्निंग सुरु करावे व मुलांना आधुनिक शिक्षण द्यावे. ई-लर्निंगच्या माध्यमातून मुलांना जगातील उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, ई-लर्निंगसाठी आणखी निधीची आवश्यकता असल्यास 7 दिवसांच्या आत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. लहान बालके ही देशाचे भविष्य असल्यामुळे नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांना आपण आधुनिक शिक्षण दिले पाहिजे. राज्यात 60 हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आज देशात तिसऱ्या स्थानावर असल्याचे त्यांनी सांगितले.

  शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पंतप्रधानांनी स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे देशातील शेतकऱ्यांना हमी भाव देत असताना त्याचा जो उत्पादन खर्च आहे. त्यात 50 टक्के नफा आवश्यक मानून हमी भाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. हमी भाव ठरविताना आता उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा धरुन हमी भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

  प्रधानमंत्री आवास योजनेतून तुमसर नगरपालिका क्षेत्रासाठी 3 हजार घरे मंजूर करण्यात आली असून शहरातील एकही गरीब व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. जिल्हयातील 1 लाख 75 हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांकडून अर्ज न मागविता सर्व महसूली नोंदी बदलवून हे काम प्राथम्याने करावे, असे सांगितले.

  पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यातील 47 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 150 कोटी रुपये रक्कम कर्जमाफीच्या योजनेतून जमा केली आहे. जिल्ह्यात 65 योजनांच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्याप्रमाणे नागपूरचा विकास सुरु आहे, त्याचप्रमाणे भंडारा जिल्हयाचा सुध्दा विकास करण्यात येईल. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून शेतकऱ्यांना मोठी मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  आमदार वाघमारे म्हणाले, तीन वर्षात तुमसर शहराच्या विकासाच्या दृष्टीने बराच काही निधी मिळाला आहे. ही नगरपरिषद सर्वसामान्यांची आहे. तुमसर व मोहाडी तहसीलच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करुन ते पुढे म्हणाले गायमुख व चांदपूरच्या पर्यटन विकासाला गती मिळाली असून पर्यटन विकासासाठी 5 कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या रेती घाटांचा लिलाव करण्यात आलेला नाही ते रेती घाट ग्रामपंचायतला चालवायला दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केले.

  प्रास्ताविकातून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी तुमसर शहराच्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी तुमसर नगरपरिषेदच्या विकास कामांवर काढण्यात आलेल्या झेप या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आजतागायत नगराध्यक्षपद भूषविलेल्या माजी नगराध्यक्षांचा व हयात नसलेल्या नगराध्यक्षांच्या वारसांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तुमसर नगरपरिषदेचे अधिकारी, नगरसेवक,शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी, महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहुल डोंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी मानले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145