Published On : Wed, Sep 12th, 2018

मूल्यवर्धन कार्यक्रम अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Advertisement

मुंबई: मुल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा कार्यक्रम अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाला दिल्या.

मूल्यवर्धन कार्यक्रमासंदर्भातील व्हिडिओ कॉन्फरन्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शांतीलाल मुथ्या फाऊंडेशनचे शांतीलाल मुथ्या यांच्यासह राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्या त्या शाळेतील प्रमुख शिक्षकांसह उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आज प्रेरणा मिळत आहे ही बाब अत्यंत समाधानाची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा कार्यक्रम अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट शालेय शिक्षण विभागाने ठेवणे आवश्यक आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि आकलनक्षमता वाढविण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु असे करीत असताना शिक्षकांचे मूल्यसंवर्धन आणि विद्यार्थ्यांचे गुणवत्तासंवर्धन यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे.

मूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमधील रचनावादी दृष्टीकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये पालक आणि शिक्षक यांचा अधिकाधिक समावेश असणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मुल्यधिष्ठित दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज असून मुल्यवर्धन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांचा फक्त बुध्द्यांक वाढवून चालणार नाही तर विद्यार्थ्यांमधला भावनिक बुध्द्यांक वाढणेही आवश्यक आहे. त्यामुळे मूल्यवर्धन कार्यक्रमाचे महत्त्व शिक्षकांमध्येही रुजणे आवश्यक आहे, असेही श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

शिक्षणमंत्री श्री.तावडे यावेळी म्हणाले, एमसीईआरटीमार्फत मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाचा राज्यातील विद्यार्थ्यांना कसा फायदा होत आहे याचे दस्ताऐवजीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भातील यशकथा एकत्र करण्यात याव्यात.

मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी
मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मुल्यधिष्ठित दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे. 2009 साली मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील 500 शासकीय शाळांमध्ये झाली. बीडच्या धर्तीवर सुरु झालेला पथदर्शी प्रकल्प सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. 2015 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमांचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून हा आराखडा 2016 पासून 34 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका केंद्रात सुरु करण्यात आला. तर 2017 मध्ये त्याची व्याप्ती वाढवून 107 तालुक्यातील 20 हजार शाळांपर्यंत पोहोचला होता. तर सन 2018 मध्ये तर हा मूल्यवर्धन कार्यक्रम 215 तालुक्यातील 40 हजारहून अधिक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.