सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले
नागपूर : संपूर्ण विदर्भातून नागपूर येथे शिक्षण घेत असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उपलब्ध करुन देण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकल मराठा समाज नागपूरच्या युवा कार्यकारिणी समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
रामगिरी येथे नागपूर सकल मराठा समाज युवा कार्यकारिणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उपलब्ध करुन देण्याबाबतचे निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, युवा कार्यकारिणीचे प्रमुख लक्ष्मीकांत किरपाने, जयसिंग भोसले, आशिष निंबाळकर, संकेत किरपाने, निखिल बाजळ यांनी या मागणी संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.
उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर येथे संपूर्ण विदर्भातील शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेण्यास तसेच भाड्याने राहण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी तसेच रोजगारासाठी स्थानांतरित होत असलेल्यांना नागपूर शहरात सर्व सुविधा असणारे मराठा वसतीगृह उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे सकल मराठा समाज नागपूर युवा कार्यकारणीने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना केली आहे.