Published On : Fri, Sep 21st, 2018

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : राज्यात विविध विकासात्मक प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. उद्योग विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यात राज्य अग्रेसर आहे. राज्यातील या विकासात्मक प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

ऑस्ट्रेलियातील गुंतवणूक सल्लागार मंडळाने राज्यात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ राज्यात भेटीसाठी आले आहे. या बैठकीला ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत टोनी हुबर, मुख्य गुंतवणूक अधिकारी डॅमियन ग्रॅहम, गुंतवणूक नियोजन प्रमुख डॅमियन लिलिक्रॅप, इमर्जिंग मार्केटच्या व्यवस्थापिका श्रीमती कॅरोलिन गोरमन, नॉन कोर मार्केटच्या व्यवस्थापक श्रीमती एमिली फंग यांच्यासह इतर सदस्य तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव सतीश जोंधळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, परकीय गुंतवणूकदारांची पसंती महाराष्ट्राला आहे. देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक राज्यात होते. निर्यात क्षेत्रातही राज्याचे काम उल्लेखनीय आहे.राज्याची बॅलन्सशीट मजबूत असल्याने राज्यात होणारी परकीय गुंतवणूक सुरक्षित आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला.

राज्यात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावासह सेवा क्षेत्रातही गुंतवणुकीला भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच राज्यात मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष असल्याने गृहनिर्माण क्षेत्रातही गुंतवणूक फायदेशीर आहे. तसेच ऊर्जा व या क्षेत्रातील पुनर्वापर या क्षेत्रातही गुंतवणूक करण्यास मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याने 2025 पर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट ठेवले असून सध्या राज्यातील गुंतवणुकीसाठी योग्य काळ असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.