नागपूर : 18 नागपूर ही जन्मभूमी तसेच कर्मभूमी असून, नागपूरकर जनतेच्या प्रेमाचा स्मृतीगंध सदैव स्मरणात राहील. नागपूरकरांनो, तुमच्या ह्रदयातील जागा सदैव राखीव ठेवा, असे भावनोद्गार भारताचे सरन्यायाधीश, सत्कारमूर्ती शरद बोबडे यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना काढले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरेश भट सभागृहात आयोजित नागरी सत्कारा कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मानपत्राचे वाचन केले.
व्यासपीठावर महापौर संदीप जोशी, पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती रवी देशपांडे, उपमहापौर मनीषा कोठे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.
नागपूरकरांकडून होत असलेल्या सत्कार, प्रेम आणि आपुलकीमुळे निशब्द झाल्याचे सांगताना त्यांनी शहराला महनीय व्यक्तींची परंपरा लाभली असल्याचे सांगितले. देशाच्या सरन्यायाधीशपदी झालेली निवड ही आई-वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे संस्कार व नागपूरकरांच्या प्रेमाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरला उच्च व्यक्तिमत्त्त्वांची देणगी लाभल्याचे अनेक उदाहरणांसह सरन्यायाधीशांनी सांगितले. नागपूरच्या न्यायीक परंपरेचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. नोबेल पुरस्कार विजेत्यांपासून ते नकलाकार नाना रेटर यांच्यासहीत शहरातील विविध क्षेत्रातील बुद्धीजिवींचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. सरन्यायाधीशांच्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषणात नागपूरविषयीची आत्मियता दिसत होती.
नागपूरचा नागरिक म्हणून त्यांनी नाग नदीची शुध्दता व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सरन्यायाधीश म्हणून दिल्लीत शपथविधी झाला. मात्र आज नागपुरातील हृदय सत्कारात खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश झाल्याची नम्र भावना त्यांनी व्यक्त केली.
नागपूरच्या कुशीत आणि मुशीत घडलेले सरन्यायाधीश शरद बोबडे हे भाषाप्रभू असून, सकारात्मक ऊर्जासुत्राचे धनी असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. शरद बोबडे हे भारतीय न्यायव्यवस्थेतील कोहिनूर हिरा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर न्याय प्रक्रियेत होतो. त्यासोबतच संवेदनशीलता जपणारे ऋजू व्यक्तिमत्त्वाचे धनी सरन्यायाधीश शरद बोबडे असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या नियुक्तीचा सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदारांच्या भाषणातून सरन्यायाधीशांच्या ज्ञानाविषयीचा आदर ओतप्रोत भरुन वाहत होता.
पक्षीय भेदाभेद विसरुन नागपुरातील नेते नागरी सत्कारासाठी एकत्र येतात, त्यातच शरद बोबडे यांच्याविषयीचा आदर व्यक्त होत असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. नम्रता, शालीनता, सहजता सोबत संवेदनशीलता यांचा सुरेख मिलाफ म्हणजेच सरन्यायाधीशांचे व्यक्तिमत्त्व होय. सरन्यायाधीश म्हणून भारताचे नाव जगात लौकिकास येईल. तसेच येणाऱ्या काळात लोकशाही न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून आणखी मजबूत व गुणवत्तापूर्ण होईल, असा दुर्दम्य विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरन्यायाधीशपदी शरद बोबडे यांची नियुक्ती हा नागपूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याची गौरव भावना राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
न्यायसंस्था एकसंघ ठेवण्याची जबाबदारी सरन्यायाधीशांवर असून, सरन्यायाधीशांना शांतीदूताची उपमा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली.
या कार्यक्रमाला शहरातील व विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिकांची उपसि्थती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर संदीप जोशी, संचालन श्रीमती श्वेता शेलगावकर तर आभार उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे यांनी मानले.