Published On : Sat, Jan 18th, 2020

खऱ्या अर्थाने आज सरन्यायाधीश झालो !

भव्य नागरी सत्कारात सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे गौरवोद्‌गार

नागपूर : नागपूर माझ्या नसानसांत भिनले आहे. नागपूर शहर माझ्या अस्तित्वाचा भाग आहे. व्यक्ती संस्कारामुळे नाव मिळवितो. ते संस्कार नागपुरात माझ्यावर झाले, याचा मला अभिमान आहे. महामहीम राष्ट्रपतींनी नवी दिल्लीत मला सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. मात्र, नागपूरकरांचे प्रेम पाहून मी कृतार्थ झालो. आज मला खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश झाल्याचे वाटते आहे, असे गौरवोद्‌गार भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काढले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी (ता. १८) कविवर्य सुरेश भट सभागृहात सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश रवी देशपांडे, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त अभिजीत बांगर यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी आपल्या भाषणातून नागपूरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तेलंगखेडी, अंबाझरी आणि महाराजबाग ह्या आवडत्या ठिकाणांचा उल्लेख केला. बापूजी अणे, जनरल आवारी, दिवंगत माजी मुख्यमंत्री मा.सां. कन्नमवार, गोळवलकर गुरुजी, ए.बी. बर्धन, वसंतराव साठे, रिखबचंद शर्मा, राजाभाऊ खोब्रागडे, जांबुवंतराव धोटे, गोविंदराव देशमुख, डॉ. गोपाळराव देशमुख अशा अनेक व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करीत त्यांच्या कार्याने आपण प्रेरीत झाल्याचे सांगितले. जनार्दन स्वामींनी याच भूमीत योग शिकवला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मानव धर्माचा प्रसार केला. नकलाकार नाना रेटर यांनी केलेल्या मनोरंजनाचाही गौरवाने उल्लेख केला. एम्प्रेस मिल, मॉडेल मिलचा उल्लेख करीत मॉडेल मिलच्या पोंग्याने लोकांना वेळेत कामात पोहचविले. या देशातील सर्वात मोठी क्रांती याच भूमीत झाली. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती केली. तीच नागपूरची भूमी आज दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाते, असा नागपूरचा गौरवोल्लेख त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, प्रत्येकजण आज अधिकाराच्या गोष्टी करतो. मात्र, घटनेने दिलेल्या अधिकारासोबतच नागरिकांनी आपली कर्तव्ये विसरायला नको. प्रत्येक व्यक्तीने कर्तव्याची जाणीव ठेवायला हवी. काळाच्या ओघात नागपूर बदलले आहे. नागपूर महानगरपालिका शहराची स्वच्छता, मूलभूत सोयी-सुविधांची जबाबदारी चोखपणे पार पाडत असल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपूरकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या हृद्य सत्कार प्रसंगी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. महापौर संदीप जोशी यांनी प्रास्ताविकातून सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा जीवनपट सांगितला. त्यांचा सत्कार नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे कर्तृत्व प्रत्येक नागपूरकरांना प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आयुक्त अभिजीत बांगर यांनी गौरवपत्राचे वाचन केले. संचालन श्वेता शेलगांवकर यांनी केले. आभार उपमहापौर मनीषा कोठे यांनी मानले.

सरन्यायाधीशांनी नागरिक म्हणून केली महापालिकेला विनंती
सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागरिक म्हणून महानगरपालिकेला विनंतीही केली. फुटाळा, तेलंगखेडी आणि शुक्रवारी तलाव भूमितगत प्रवाहाने जोडलेले आहेत. ही तळे नागपूरला पाणीपुरवठा करु शकतात. ही प्रणाली पूर्ववत सुरू करण्याच्या विनंतीसह नागपूरची ओळख असलेल्या नागनदीचे शुद्धीकरण करून प्रवाहातील अडथळे दूर करण्याची विनंतीही त्यांनी केली. नागपूरकरांनी दिलेल्या प्रेमाचा स्मृतिगंध सदैव स्मरणात राहील. आपण सर्वांनी हृदयात दिलेले स्थान कायम राखीव ठेवावे, असे कृतार्थ उद्‌गार त्यांनी काढले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे भाषण संपताच सभागृहात उपस्थित हजारो नागरिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना सन्मान दिला.

सरन्यायाधीशांच्या ‘व्हीजन’मुळे लोकशाही समृद्ध होईल : ना. नितीन गडकरी
सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूर शहराचा अभिमान आहे. त्यांना बोबडे कुटुंबाकडून उत्तम विरासत मिळाली. त्यांचा प्रवास परिवाराच्या लौकिकानुसारच झाला. त्यांच्यातील संवेदनशीलता ज्यांनी-ज्यांनी अनुभवली त्यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे काय आहे, हे माहिती आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमी म्हणून विदर्भाची ओळख झाली त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी शेतकरी चळवळीत उडी घेतली. यातूनच त्यांच्यातील माणुसकीचा परिचय होतो. शालिनता, नम्रता हे श्री. शरद बोबडे यांच्या व्यक्तिमत्वाचे गुण आहेत. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व मोठे झाले. त्यांच्या प्रत्येक कार्यातून, निर्णयातून नागपूरचा सन्मान वाढेल, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूरला सेंट्रल लॉ युनिव्हर्सिटी मिळण्यामागे दोन व्यक्तींचे श्रेय आहे. त्यात न्या. विकास सिरपूरकर आणि दुसरे सरन्यायाधीश शरद बोबडे, असा गौरवोल्लेख त्यांनी केला. न्यायपालिका स्वतंत्र, पारदर्शी आहे. त्यामुळे अशा न्यायपालिकेचे सर्वोच्च पद भूषविताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कर्तृत्वाने गुणात्मक बदल होईल आणि त्यांच्या निर्णयांमुळे नागपूरकरांची मान उंच होईल, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

सरन्यायाधीशांच्या रूपाने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : न्या.भूषण गवई
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या रूपाने नागपूरच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला आहे, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई यांनी केला. सरन्यायाधीश शरद बोबडे यांना बऱ्याच वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे. परंतु त्यांच्याजवळ सर्वात मोठा संग्रह माणसांचा आहे. केवळ नागपुरातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचा मित्रपरिवार आहे. अनेक जाती-धर्माचे, विविध भाषा बोलणारे मित्र म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या देशाची न्यायपालिका स्वतंत्र नाही त्या देशाची लोकशाही सुदृढ नाही. भारताच्या न्यायपालिकेला एकसंघ ठेवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर आहे ती व्यक्ती म्हणजे सरन्यायाधीश. आणि ही जबाबदारी एका नागपूरकरावर आहे, याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

ना. अनिल देशमुख, ना. नितीन राऊत,
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आठवणींना उजाळा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या भाषणात नरखेड सभापतीपदाच्या निवडणुकीतील किस्सा सांगितला. सभापती पद मिळाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोर्टात धाव घेतली. ती केस तेव्हाचे उच्च न्यायालयातील वकील शरद बोबडे यांनी शेतकरी संघटनेच्या बाजूने लढली. त्यांनी असा युक्तिवाद केला की माझे सभापतीपद गेले. परंतु, जे झाले ते चांगले झाले. त्यानंतर मी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आणि मंत्री झालो, असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, तटस्थ राहून न्यायदानाचे कार्य करीत असताना न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्यातील हळव्या, प्रेमळ माणसाचे दर्शन होते. एक उत्तम खेळाडू, उत्तम छायाचित्रकार, उत्तम टेनिसपटू, उत्तम मित्र असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. त्यांनी आजपर्यंत दिलेले अनेक निर्णय ऐतिहासिक राहिले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणजे मौल्यवान कोहिनूर हिरा असल्याचा गौरव त्यांनी आपल्या वक्तव्यातून केला.

ना. सुनील केदार यांनी शेतकऱ्याच्या मुलाला सरन्यायाधीशांच्या सत्कार कार्यक्रमाच्या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल महापौरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग असून ग्रामीण भागातील प्रश्नांची आणि शेतकऱ्यांच्या वेदनेची त्यांना कणव आहे. त्यामुळे त्या पदावरून वंचितांना न्यायदानाचे ते कार्य करतील, असे सांगितले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांच्या वतीने सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन केले. नागपूरच्या मातीशी ज्याचे नाते आहे, अशा सुपुत्राला देशाच्या न्यायपालिकेतील सर्वोच्च सन्मान मिळाला याचा अभिमान असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त कसे करता येईल, याची संकल्पनाच श्री. शरद बोबडे यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या केसचे ते पैसेही घेत नव्हते. त्यांच्यातील संवेदनशीलतेमुळेच त्यांचं मातीशी नातं जुळले. ते भाषाप्रभू आहेत. देशी-विदेशी भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात पुढील काळात वंचितांना अधिकार देण्याचे कार्य त्यांच्या हातून घडेल. सुवर्णाक्षराने अधोरेखित करण्यासारखा त्यांचा कार्यकाळ राहील, या शब्दात त्यांनी सरन्यायाधीशांचा गौरव केला.

कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, आमदार कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रमेश बंग, न्या. विकास सिरपूरकर, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, मनपाचे स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, राकाँ गटनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, माजी महापौर प्रवीण दटके, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री रणजित देशमुख, भंते सुरई ससाई, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, उच्च न्यायालयातील न्यायाधीश, ज्येष्ठ विधीज्ञ, ज्येष्ठ वकील मंडळी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.