File Pic
नागपूर: छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे नागपुरात आयोजित करण्यात येत असून येत्या 28 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा नागपुरात होतील. या स्पर्धेचे उद्घाटन 28 रोजी सायंकाळी 7 वाजता समर्थ व्यायाम शाळा प्रतापनगर येथे करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या संदर्भात नुकतीच एक बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नागपुरात राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. 18 वर्षाआतील मुले-मुली व 21 वर्षाच्या आतील मुले-मुली अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीला या स्पर्धेचा समारोप होईल.
या स्पर्धेसाठी एकूण 32 व्हॉलिबॉल संघ नागपुरात येणार असून शासनाने 50 लाख रुपये एवढा निधी या स्पर्धेसाठी मंजूर केला आहे. यापैकी 35 लाख रुपये उपसंचालक जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी एक समिती गठित करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री बावनकुळे आहेत. उपाध्यक्ष जि.प. अध्यक्ष, स्थानिक आमदार, महापौर तर कार्याध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी आहेत. राज्य व्हॉलिबॉल असो.चे सचिव या समितीचे सचिव आहेत. क्रीडा उपसंचालक हे कोषाध्यक्ष आहेत तर अन्य संघटनांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
खेळाडूंच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. एकूण 32 संघातून 448 खेळाडू नागपुरात येणार आहेत. दररोज सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 या दरम्यान खेळांचे सामने होतील.