Published On : Thu, Dec 27th, 2018

राष्ट्रवादीचा ‘निर्धार परिवर्तनाचा’ शुभारंभ छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून;तर महाडच्या चवदार तळयाच्याठिकाणी पहिली सभा…

Advertisement

१० जानेवारीपासून निर्धार परिवर्तनाचा.

मुंबई : सरकारचा भ्रष्टाचार…अनेक गंभीर चूका…आत्तापर्यंत झालेले घोटाळयांचे आरोप…दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश…नागरी वस्त्यांमधील नियोजनाचा अभाव…घनकचऱ्याचा प्रश्न आणि चार वर्षात पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन केलेली लूट…असे अनेक प्रश्न घेवून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीदवाक्य घेवून परिवर्तन यात्रा काढत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

१० जानेवारीपासून परिवर्तन यात्रा जवळपास ८ ते १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून या परिवर्तन यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. तर पहिली सभा सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाडच्या ऐतिहासिक चवदार तळयाच्याठिकाणी घेतली जाणार आहे. या परिवर्तन यात्रेमध्ये विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह इतर सर्व नेते सहभागी होणार आहेत.

ही निर्धार परिवर्तन यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हयातील प्रत्येक गावामध्ये जाणार असून राज्यातील जनतेला सरकारच्या मनमानी कारभाराची जाणीव करुन देवून जनतेचे सहकार्य घेणार असल्याचेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केंद्र आणि राज्यसरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली. राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री जिथे जातात तिथे म्हणजेच काल शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला त्यांची पत्नी आणि मुलगा यांना पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्याचे काम हे सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांना आंदोलनकर्त्यांची सध्या भीती वाटू लागल्याने पोलिसांचा अतिरेकी वापर करुन त्यांना पोलिस कोठडीत डांबण्याचा प्रकार केला जात आहे. सांगलीमध्ये धनगर समाजाचे नेते विष्णू माने यांना पोलिसठाण्यात बसवून ठेवण्यात आले, धुळयामध्ये शेतकरी मोर्चा काढणाऱ्या प्रतिभा शिंदे या महिला शेतकऱ्यालाही स्थानबध्द करण्यात आले. पंढरपूरला ज्यावेळी सगळेजण एकादशीला एकत्र जाणार होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांना जाता आले नव्हते. त्याला जबाबदार असणाऱ्यांना छळण्याचे काम सुरु असून आणीबाणीच्या काळामध्ये जे होत नव्हते ते या महाराष्ट्रात सरकार करत असल्याचा आरोपही आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

नाशिक आणि परिसरामध्ये कांदयाची अवस्था काय आहे. काल कांदयाला ५० पैसे किलो दर मिळाला. सरकारने घाईगडबडीने २ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु सरकार हे अनुदान कुणासाठी देते आहे हाच प्रश्न लोकांना पडला आहे. आधारभूत किंमतीपर्यंत पीक पोचत नसेल तर सरकारने बाजारात उतरुन कांदा चढयादराने खरेदी केला पाहिजे त्याशिवाय कांदयाचा भाव स्थिर होणार नाही अशी मागणीही आमदार जयंतराव पाटील यांनी केली.

गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला त्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारने जीआरमध्ये जाहीर केली ही त्यांची चेष्टा करण्याचा प्रकार आहे. नाशिकमध्ये फक्त एका शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट आले बाकी कुठल्याही शेतकऱ्यावर आले नाही हे सरकारने कसे शोधून काढले असा सवालही आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारला केला.

कर्जमाफीबाबतही सरकारची भूमिका स्पष्ट नाही. अक्षरश: बोजवारा उडालेला आहे. कर्जमाफीबाबात शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. ९० टक्के कर्जमाफी दिल्याचे भाजपचे अध्यक्ष दानवे विधान करत आहेत. परंतु सरकारने फक्त १५ ते १६ हजार कोटी रुपयेच कर्जमाफीची रक्कम वाटली आहे. याचा अर्थ राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची इच्छा नाही. शेजारच्या राज्यामध्ये निवडणूका होवून दोन तासात कर्जमाफी देण्यातही आली आम्ही गेली साडेचार वर्ष शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मागत होतो परंतु सरकारने काय दिले आणि काय दिले नाही हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे असेही आमदार जयंतराव पाटील म्हणाले

या सगळ्या प्रश्नांचा ऊहापोह जनतेच्या मैदानात आणि दारात जावून करणार आहेच शिवाय निर्धार परिवर्तनाचा ही भूमिका मनात घेवून परिवर्तन यात्रा सुरु करत असल्याचेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदयाताई चव्हाण, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, माध्यम विभागाचे प्रमुख संजय खोडके आदी उपस्थित होते.