Published On : Thu, May 10th, 2018

डॉक्टरांनी केला आराम करण्याचा सल्ला : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतरही छगन भुजबळ रुग्णालयातच होते. त्यांना आज डिस्चार्ज झाला. त्यानंतर आज तब्बल दोन वर्षानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला. यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड आनंद आहे. भुजबळ परत राजकारणात अॅक्टिव्ह होतील, ते कोणती नवी खेळी खेळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं असतानाच भुजबळ यांनी मात्र आपल्याला नेहमी प्रमाणे अॅक्टिव्ह होण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे, असं सांगितलं आहे.

‘गेल्या साडेतीन महिन्यांपासून मी आजारी आहे. सीटीस्कॅन केल्यानंतर मला स्वादूपिंडाचा आजार असल्याचं निदान झालं. केईएमच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्ठा करून मला बरं केलं. मी पूर्णपणे बरा झालेलो नाही. पण बराच फरक पडला आहे. आज डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी काही सल्ले दिलेत. त्यांनी नेहमीसारखं अॅक्टिव्ह न राहण्याचा सल्ला दिला आहे. आराम करायला सांगितलं आहे. त्यामुळे काही दिवस मी कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार आहे,’ असं भुजबळ म्हणाले. आजारामुळे कदाचित पुन्हा रुग्णालयात अॅडमिट व्हावे लागेल. काही शस्त्रक्रियाही कराव्या लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पडत्या काळात शिवसेनेनी आधार दिला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी बुधवारी भुजबळ यांच्या सांगण्यावरून ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘तब्येतीची काळजी घ्या, कुटुंबीयांसोबत राहा, महिनाभरानंतर भेटून बोलू’, अशा शब्दांत उद्धव यांनी यावेळी भुजबळांविषयी आपुलकी व्यक्त केल्याचे कळते. तुरुंगात असतानाही आधीचे वितुष्ट बाजूला ठेवत शिवसेनेने भुजबळ यांची बाजू घेतली होती, यावर भुजबळांनीही पडत्या काळात शिवसेनेनी आधार दिला, असे म्हंटले आहे.