Published On : Sun, Apr 23rd, 2017

५६ तास स्वयंपाक करून विष्णू मनोहर यांनी रचला रेकॉर्ड

Nagpur: आगळ्यावेगळ्या शैलीत एकाहून एक चविष्ट पदार्थांची ‘रेसिपी’ सांगणारे सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी सलग ५६ तास स्वयंपाक करत ‘विश्वविक्रम’ रचला. ५६ तासांत मनोहर यांनी एक हजारांहून अधिक चविष्ट पदार्थ बनवल्याची माहिती आयोजकांनी दिली.

विष्णू मनोहर यांनी अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांचा सलग ४० तास स्वयंपाक करण्याचा विक्रमही मोडला असून आता मनोहर यांचे नाव ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदवण्यात येईल. प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल कामत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मैत्री परिवारच्यावतीने ‘मॅरेथॉन कूकिंग’चा हा आगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्समध्ये खास तयार करण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा स्वयंपाकघरात शुक्रवारी सकाळी या उपक्रमाला सुरूवात झाली.

महाप्रसादाकरिता लागणारा शिरा तयार करून मनोहर यांनी त्यांच्या पदार्थ तयार करण्याच्या जागतिक विक्रमाची सुरुवात केली. त्यापाठोपाठ नैवेद्यासाठी लागणारे मोदक तयार केले.