नागपूर: नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदानादरम्यान गोंधळ उफाळला आहे. काँग्रेस उमेदवार बंटी शेल्के यांच्या समर्थकांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर हल्ला करून ईव्हीएम लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली असून, यात एक व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्यासोबतही धक्काबुक्की व मारहाण केली. गोंधळ पाहता घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बूथ क्रमांक २६८ वरून मतदान कर्मचारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन स्ट्राँग रूमकडे नेत होते. याच दरम्यान, काही अज्ञात हल्लेखोरांनी तलवारी आणि चाकूंनी या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात वाहनचालकाच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.
घटनेनंतर काँग्रेस उमेदवार बंटी शेल्के आपल्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले आणि हंगामा सुरू केला. यावेळी काँग्रेस समर्थकांनी वाहनांची तोडफोड केल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि भाजप उमेदवार प्रवीण दटकेही आपल्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले.
या घटनेदरम्यान, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दटके यांच्यासोबतही धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, जखमी वाहनचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.