नागपूर : राज्यात दारूबंदी करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही, तर चंद्रपुरातील दारूबंदी मागे घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेच्या उत्तरात ना. बावनकुळे बोलत होते. चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात दारू मिळते आणि महाराष्ट्राबाहेरून दारू राज्यात येऊन ती अवैधपणे विकली जात आहे. कालच 1 कोटी 34 लाख रुपयांची दारू पकडली असल्याकडे आ. वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्षवेधले.
यावर उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्राबाहेरून अवैध दारू राज्यात येत आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठीच ग्रामरक्षक दलाचा कडक कायदा शासनाने केला आहे. उत्पादन शुल्क विभागाची दारूबंदीबाबत आणि अवैध दारूबाबत कडक कारवाई नसती तर 2017-18 मध्ये 507 गुन्हे नोंदविण्यात आले नसते. शासन चंद्रपुरात दारूबंदीसाठी कठोर उपाययोजना करीत आहे.
ग्रामरक्षक दलाचे गठन प्रत्येक ग्रामपंचायतीने करावे असे सांगत ना. बावनकुळे यांनी संपूर्ण सभागृहातील सदस्यांना विनंती करून आवाहन केले की, ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठ़ी शासनाला सहकार्य करा. या कायद्यात 24 तासात कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय अवैध दारूवर नियंत्रण मिळवता येणार नाही. यासाठीच ग्रामरक्षक दल स्थापन करणे आवश्यक असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील दारुबंदीबाबतच्या गुन्हा अन्वेषणाची कामगिरी उंचावण्यासाठ़ी शासनाने राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाच्या आस्थापनेवर अधिकारी व कर्मचार्यांची प्रत्येकी 22 पदे मंजूर केली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 24.54 कोटींचा मुद्देमाल, वर्धा जिल्ह्यात 18.96 कोटींचा मुद्देमाल तर गडचिरोली ल्ह्यिात 8.85 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सन 2017-18 मध्ये या तीनही जिल्ह्यांमध्ये एकूण 25898 आरोपींना अटक करण्यात आली.
या प्रश्नाच्या चर्चेत श्रीमती कुपेकर, आ. वीरेंद्र जगताप, आ. अजित पवार यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.