Published On : Thu, May 17th, 2018

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

Advertisement

Tiger Attack
नागपूर/चंद्रपूर: चिमूर नगरपरिषद हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील दोन शेतकरी कोटगाव परिसरातील शिवारात बैल व इतर जनावरे चराईसाठी गेले असताना एका पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना जखमी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. गोपाल ढोणे (५०) व उत्तम ढोणे (३०) रा. सोनेगाव बेगडे अशी जखमींची नावे आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे जनावरांना दूरपर्यंत जंगल परिसरात चराईसाठी नेले जाते. अशातच सोनेगाव बेगडे येथील गोपाल ढोणे आणि उत्तम ढोणे यांनी बुधवारी आपले बैल व इतर जनावरांना कोटगाव रिठी परिसरातील शेतशिवारात चराईसाठी नेले होते. दरम्यान, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. यात गोपाल ढोणे आणि उत्तम ढोणे हे गंभीर जखमी झाले. जवळपास असलेल्या नागरिकांना घटना लक्षात येताच आरडाओरड केली. त्यामुळे वाघ पळून गेला. जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

रानडुकराच्या हल्ल्यात जखमी
शंकरपूरपासून जवळच असलेल्या डोमा येथील तेंदूपत्ता मजुरावर रानडुकराने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. लक्ष्मण मून(५२) असे जखमीचे नाव आहे. ते खापरी शिवारात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. अचानक रानडुकराने हल्ला केला. आजूबाजूच्या मजुरांनी आरडाओरड केल्याने रानडुकर पळून गेला.