
चंद्रपूर : मतदारांचे अधिकार आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत चंद्रपुरात काँग्रेसच्या वतीने ‘वोट बचाओ–देश बचाओ’ जनआंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार ‘लोकतंत्र बचाओ सप्ताह’ अंतर्गत गुरुवारी हे आंदोलन आयोजित करण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित सभेत लोकशाही व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी तसेच संविधानाचे महत्त्व जपण्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. मतदारांना मिळालेला मतदानाचा अधिकार अबाधित राहावा आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.
आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यात आले.



