
नागपूर : नागपूरच्या फारूक नगर परिसरात गोवंश तस्करीच्या संशयावरून पाचपावली पोलिसांनी कारवाई करत सात गोवंशांची सुटका केली. कत्तलखान्यात नेण्याच्या उद्देशाने या गोवंशांना टीनच्या शेडमध्ये निर्दयीपणे बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान संशयित आरोपी फरार झाले असून, वाचवण्यात आलेल्या गोवंशांना सुरक्षिततेसाठी धंतोली येथील गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाचपावली पोलिसांचे पथक परिसरात गस्तीवर असताना फारूक नगर येथे गोवंशांना अमानुष स्थितीत डांबून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी छापा टाकून सात गोवंशांची सुटका केली.
पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच घटनास्थळावरील संशयित पसार झाले. या गोवंशांचा संबंध वसीम हक नावाच्या व्यक्तीशी असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. पाचपावली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, फरार संशयितांचा शोध सुरू आहे.



