नागपूर – जागतिक सर्पदिन १६ जुलै २०२५ च्या निमित्ताने इंडियन नॅचरल हनिबीज, पुणे तसेच स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प), वाळूज आणि कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात राज्यभरातील मधमाशी मित्र, सर्पमित्र व जैविक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात नागपूर शहरातील मनीषनगर येथील सर्पमित्र, प्राणीमित्र व वन्यजीव रक्षक चैताली भस्मे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. मा. केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड (खासदार, भारत सरकार) आणि मा. सौ. सुवर्णा रवींद्र माने (भा.व.से., उपवनरक्षक, छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
चैताली भस्मे यांचे जंगल संवर्धन, सर्पमित्र कार्य आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत प्रशंसनीय असल्याचे सर्व मान्यवरांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या कार्याच्या सर्वत्र कौतुकाची लाट उसळली. या कार्यक्रमास जिल्हा कृषी अधीक्षक श्री. प्रकाश देशमुख, सौ. ज्योती अविनाश गायकवाड (अध्यक्ष, जैवविविधता समिती, महाराष्ट्र शासन), डॉ. दीप्ती पाटगावकर (कार्यक्रम समन्वयक, कृषी संवर्धन केंद्र), तसेच संस्थेचे संस्थापक संजय मारणे व अविनाश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा मेळावा जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला असून, सर्पमित्र आणि पर्यावरण रक्षकांच्या कार्यास एक नवा आदर देणारा ठरला आहे.