Published On : Thu, Aug 8th, 2019

नवीन पीढ़ीने हातमाग क्षेत्रातील संधी शोधाव्यात

महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे यांचे प्रतिपादन

नागपुर : नवीन पीढीने ‘हातमाग वस्त्रोद्योग’ या क्षेत्रातील उपलब्ध संधी शोधाव्यात. ऑनलॉईन शॉपींगच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हातमाग उत्पादनासाठी ग्राहक-पेठा शोधण्यासाठी नवीन पीढी पुढाकार घेऊ शकते. महाराष्ट्र शासनाच्या ‘इंद्रायणी’ अ‍ॅपच्या धरतीवर विणकर सेवा केंद्रानेही अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी आज केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालया अंतर्गत सिवील लाईन्स स्थित विणकर सेवा केंद्र येथे ‘राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त’ आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सम्माननीय अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी नागपूरचे महापौर दीपराज पार्डीकर मुख्य अतिथीच्या स्थानी तर विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक वाय. के. सूर्यवंशी प्रामुख्याने उपास्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वदेशी चळवळीचा प्रारंभ दिन म्हणून 7 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ रूपाने 2017 पासून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे साजरा केला जात आहे. यंदाचा पाचवा राष्ट्रीय हातमाग दिवस भुवनेश्वर येथे साजरा होत आहे. विणकर सेवा केंद्राच्या माध्यमातून वस्त्रोद्योग साक्षरता निर्माण होणे आवश्यक आहे. विणकर सेवा केंद्रातील प्रशिक्षणार्थींना ‘बुटीक, फॅशन डिझाईनिंग’ या सारख्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. माधवी खोडे यांनी दिली

हातमाग उत्पादनांसंदर्भात योग्य प्रचार व प्रसार गरजेचा असून या क्षेत्रात क्रांती होणे अपेक्षित आहे, असे मत मुख्य अतिथी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी मांडले.

‘हातमाग’ हा भारतीय परंपरेचा भाग असून लुप्त होत असलेल्या या कलेचे पुर्नज्जीवन करण्यात विणकरांचे योगदान महत्वाचे आहे. मुद्रा,ई-धागा अ‍ॅप यासारख्या केंद्र शासनाच्या हातमाग क्षेत्रास सहाय्यकारी उपक्रमांमूळे या क्षेत्राला चांगले दिवस येणार असून हातमाग उत्पादनांच्या डिझाईन विकसित करण्यात व्यवस्थापन व तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक श्री. वाय. के सूर्यवंशी यांनी सांगितले.

याप्रंसगी हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्या-या विणकर तसेच तरूण उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सम्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास वस्त्रोद्योग आयुक्तालय ,नागपूर तसेच विणकर सेवा केंद्र, यंत्रमाग सेवा केंद्र या कार्यालयातील अधिकारी, प्रशिक्षणार्थी, उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विणकर सेवा केंद्राचे टेक्सटाईल डिझाईनर सौम्य श्रीवास्तव यांनी केले तर आभार प्रदर्शन तंत्रज्ञान अधिक्षक पुनीत पाठक यांनी केले.