Published On : Fri, Sep 7th, 2018

सावनेर येथील ग्राम पंचायत टाकळीमध्‍ये राष्‍ट्रीय पोषण सप्‍ताह साजरा

नागपूर: केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्‍या वतीने देशभरात सप्‍टेंबर महिन्‍यात ‘राष्‍ट्रीय पोषण अभियान’ राबविण्‍यात येत आहे. याच अभियानाच्‍या अनुषंगाने नागपूर येथील खाद्य पोषण आहार मंडळ, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्‍प, सावनेर व अदानी फाऊंडेशनच्‍या संयुक्‍त विद्यमाने सावनेर येथील ग्रामपंचायत टाकळी (भणसाळी) मध्‍ये भणसाळी आश्रम कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 1 सप्‍टेंबर ते 7 सप्‍टेंबर 2018 दरम्यान राष्‍ट्रीय पोषण सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले होते. या सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी खाद्य पोषण आहार मंडळाचे अधिकारी निरंजन सिंह, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्‍पाच्‍या पर्यवेक्षिका निलीमा ओक, अदानी फाऊंडेशनच्‍या सी.एस.आर. व्‍यवस्‍थापिका जयश्री काळे व ग्राम पंचायत टाकळीच्‍या सरपंच सविता बावणे प्रामुख्‍याने उपस्थित होत्‍या.

केंद्र शासनाने कुपोषणावर मात करण्‍यासाठी सर्व राज्‍य, जिल्हा तसेच ग्रामपंचायत प्रशासनास पोषण आहारा संदर्भात जनजागृती करण्‍याचे निर्देश दिले असून संपूर्ण सप्‍टेंबर महिन्‍यात राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्‍यात येत आहे.अदानी फाऊंडेशनच्या ‘सुपोषण’ प्रकल्पाच्या माध्यमाने सावनेर तालुक्यातील 62 गावामधून 99 अंगणवाडयाची निवड करण्यात आली आहे.

या अंगणवाड्यांमध्ये फाऊडेशंनच्या स्वयंसेविका (संगीनी) गावपातळीवर काम करून बालकामधील कुपोषण निर्मूलन तसेच हिमोग्लोबीन वृद्धिवर भर देत आहेत, अशी माहिती फाऊंडेशनच्या सी. एस. आर. व्यवस्थापिका जयश्री काळे यांनी दिली. खाद्य पोषण आहार मंडळाचे आधिकारी श्री. निरंजन सिहं यांनी उपास्थितांना पोषणाचे महत्व विषद करतांना स्तनपान, आईचे पहिले दूध, हिरव्या पालेभाज्या यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. महिला जर सुदृढ असतील तर कुटुंब सुदृढ राहते. यासाठी आपल्या आहारत कर्बोदके, प्रथिने, याचा अंतर्भाव करुन आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांच्या पदार्थांचे सेवन करावे, असा सल्ला अदानी फाउंडेशनच्या विल्मार साईटचे प्रमुख प्रदिप कुमार अग्रवाल यांनी दिला.

या कार्यक्रमाप्रसंगी खाद्य पोषण आहार मंडळा तर्फे पोषक खाद्य पदार्थांची प्रदर्शनी लावण्यात आली होती, यात माहिती, शिक्षा, संवाद मोहिमेव्दारे पोस्टरमधून उपास्थितांना माहितीही देण्यात आली. अंगणवाडी सेविका व अदानी फाऊंडेशनच्या संगीनी यांनी विविध पोषक खाद्य पदार्थाच्या व्यंजन स्पर्धेत पाककृती सजविल्या. या प्रदर्शनीचे अवलोकनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी ‘पोषण आहारा’ संदर्भात एका प्रश्नमजुंषा स्पर्धचेही आयोजन करत्यात आले होते. व्यंजन स्पर्धा व प्रश्नमजुंषा स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन अदानी फाऊंडेशनच्‍या सी.एस.आर. व्‍यवस्‍थापिका जयश्री काळे यांनी केले .या कार्यक्रमात ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व भणसाळी आश्रम कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या .