Published On : Fri, Mar 30th, 2018

CBSE: मुलांना पुन्हा परीक्षेला बसवू नका – राज


मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षेतील पेपरफुटीच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही उडी घेतली असून दोन विषयांची फेरपरीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसवूच नये,’ असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

सीबीएसईची इयत्ता दहावीची गणित व बारावीची अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच आधीच फुटल्याचं समोर आल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे. सरकारनं या दोन्ही विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. दिल्लीसह ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू असून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरापर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस पाठोपाठ आता राज ठाकरेही विद्यार्थ्यांच्या बाजूनं या वादात उतरले आहेत. ‘सीबीएसई परीक्षेचे पेपर फुटण्याला सरकारचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. सरकारला प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं?, स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना कसल्या परीक्षा द्यायला लावता; असा सवाल राज यांनी केला आहे. ‘फेरपरीक्षेला होणारा विरोध योग्यच आहे. या निर्णयावर पालकांनी ठाम राहावं. सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ द्या. मनसे तुमच्या पाठीशी उभी आहे आणि राहील. तुम्ही सरकारपुढं झुकलात तर ते तुम्हाला आणखी वाकायला लावतील,’ असंही राज यांनी पालकांना उद्देशून म्हटलं आहे.