Published On : Mon, Sep 4th, 2017

सावंगीच्या द. मे. आयुर्विज्ञान विद्यापीठातील सांस्कृतिक महोत्सव

नागपूर: दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित ‘स्वरवैदर्भी लिटिल चॅम्प’ विदर्भस्तरीय सिनेगीत गायन महाअंतिम स्पर्धेचे विजेतेपद अमरावतीच्या वैष्णवी भालेराव हिने पटकावले. सोळा वर्षाखालील बालकुमार आयोजित या स्पर्धेची उपविजेता नागपूरची श्रीया मेंढी ठरली. तर तृतीय पुरस्काराचा सन्मान सात वर्षाची सुमेधा बालपांडे (नागपूर) आणि अवंतिका ढुमणे (वर्धा) या बालगायिकांना प्राप्त झाला.

सावंगीच्या विद्यापीठ सभागृहात आयोजित या महाअंतिम स्पर्धेचे उदघाटन कुलपती, माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकुलपती आनंदवर्धन शर्मा, शरद पवार दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाअंतिम स्पर्धा जुनी लोकप्रिय गाणी, एकविसाव्या शतकातील गाणी आणि मराठी लोकधारा अशा तीन फेऱ्यात घेण्यात आली. यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या वैष्णवी भालेराव हिला प्रथम पुरस्कार २२ हजार रुपये, श्रीया मेंढी हिला द्वितीय पुरस्कार ११ हजार रुपये तर सुमेधा बालपांडे व अवंतिका ढुमणे या दोघींनाही तृतीय पुरस्कार प्रत्येकी ७ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. याशिवाय उन्मेषा वानखडे (अकोला), देवश्री चिमोटे, निधी गायकवाड (अमरावती), दिव्या शेंडे (कळंब यवतमाळ), अनुराग जाधव (कारंजा लाड), देवांश दुपारे, प्रांजल धोटे, मिताली कोहाड, स्वप्नमोय चौधरी (नागपूर) या बालकुमार गायकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.

संस्थेच्या विश्वस्त शालिनीताई मेघे, द.मे. आयुर्विज्ञान संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर इंगळे, व्ही. आर. मेघे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबाजी घेवडे, स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, सहसंयोजक सुनील राहाटे, परीक्षक गण नरेंद्र माहुलकर, संजय नाशिरकार, केतकी कुळकर्णी, अविनाश काळे, शशिकांत बागडदे, भारती भांडे कदम यांच्या हस्ते ‘स्वरवैदर्भी’ सन्मानचिन्हासह रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सर्व स्पर्धकांना गौरविण्यात आले.

स्पर्धेतील गायकांना शैलेश जगताप, चारू साळवे, दिनेश गवई, राजेंद्र झाडे, रवी ढोबळे, रितेश गुजर, निखिल झिरकुंटलवार यांनी उत्कृष्ट संगीतसाथ केली. संपूर्ण स्पर्धेचे संचालन मुबारक मुल्ला यांनी केले. विदर्भातील सर्वोत्कृष्ट बालगायकांना ऐकण्यासाठी सभागृहात संगीतप्रेमींची भरगच्च उपस्थिती लाभली होती.