नागपूर : केंद्र सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांनी या निर्णयाला ‘देशाच्या इतिहासातील स्वर्णिम क्षण’ असे संबोधले.
बावनकुळे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जातीनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून विविध समाजघटकांकडून सातत्याने केली जात होती. मात्र आजवर ती दुर्लक्षित राहिली होती.”
ते पुढे म्हणाले, “यापूर्वी फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर गटांचीच गणना केली जात होती. आता मात्र इतर सर्व जातींचाही समावेश स्वतंत्रपणे केला जाणार आहे. ही सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेली महत्त्वपूर्ण पायरी आहे.”
काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “दीर्घकाळ सत्ता उपभोगूनही काँग्रेसने ही मागणी नेहमीच दुर्लक्षित केली. त्यांनी कधीही जातीनिहाय जनगणनेला प्राधान्य दिलं नाही. त्यामुळे अनेक वंचित घटक शासकीय योजनांपासून वगळले गेले.”
“मोदी सरकारने आता या वंचित समाजांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समाजातील असमतोल दूर होईल आणि योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले की, हा दौरा आधीच निश्चित झाला होता आणि त्यामध्ये कोणताही विशेष बदल झालेला नाही.