नागपूर: शहरातील सीताबर्डी भागातील शाहिद गोवारी उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या कॅबला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.या घटनेमुळे अर्धा तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ओला कॅबला जोडलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार (MH01/BT-8501) संध्याकाळी प्रवाशांना घेऊन जात होती. यादरम्यान बोनेटमधून दाट धूर निघत असल्याचे पाहून चालक प्रदीप वासनिकने (25) लगेच कॅब थांबवली. तो आणि प्रवासी गाडीतून खाली उतरले. काही मिनिटांतच आगीने संपूर्ण कॅबला वेढले.
यामुळे पुलावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ तांबे यांच्या नेतृत्वाखाली सीताबर्डी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले.त्यांनी आग नियंत्रणात आणली.या आगीत सीट कुशन, रेडिएटर, दोन टायर, वायरिंग आणि वाहनाचे काही भाग जळून खाक झाले.