Published On : Mon, Mar 20th, 2023

सी-२० पाहुण्यांसाठी मनपाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत नृत्य

नोबल पुरस्कार प्राप्त श्री. कैलाश सत्यार्थींनी केले कौतुक
Advertisement

नागपूर: नागपूर शहरात सुरू झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या नागरी संस्था अर्थात सी-२० बैठकांसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत नागपूर विमानतळ येथे नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर करून केले.

सोमवारी (ता.२०) नागरी संस्थांच्या बैठकीच्या उद्घाटनासाठी नोबल पारितोषिक विजेते श्री. कैलाश सत्यार्थी यांचे शहरात आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री. सत्यार्थी यांचे मनपाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर करून स्वागत केले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कला दिग्दर्शक रूपेश पवार, नृत्य दिग्दर्शक साक्षी गायधने उपस्थित होते.

नागपूर शहरात सोमवार २० मार्चपासून नागरी संस्थांच्या बैठकीला सुरूवात झाली. या बैठकीच्या अनुषंगाने नागपूर शहरात रविवारपासूनच जी-२० सदस्य देशांसह आमंत्रित देशांतील मान्यवरांचे आगमन होत आहे. शहरात येणा-या या विदेशी पाहुण्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे. यात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून देशाच्या विविध भागातील संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करून स्वागत केले जात आहे.

देशाच्या विविध भागातील संस्कृती आणि परंपरा दर्शविणारी वेशभूषा आणि त्यानुसार ‘त्या’ राज्यातील नृत्याचे सादरीकरण करून येणा-या पाहुण्याचे मनपाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. पाहुण्यांचे स्वागत करणा-या चिमुकल्यांचे श्री. कैलाश सत्यार्थी यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.