Published On : Thu, May 24th, 2018

परवानाधारक कृषी केंद्राकडून अधिकृत कपाशी बियाणे खरेदी करा – कृषी सहसंचालक एन.पी. सिसोदे

Advertisement
  • उन्नत शेती, समृध्द शेतकरी अभियानाचा शुभारंभ
  • बाराशे गावात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन
  • मोंढा पांजरी येथे अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्द प्रतिसाद


नागपूर: बोंड अळीचा प्रादुभार्व तसेच शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातून कपाशीचे बियाणे खरेदी करावे. तसेच खरेदी केलेल्या बियाण्यांचे पावती सांभाळून ठेवल्यास संबंधित उत्पादक कंपनी विरुध्द कारवाई करणे सुलभ होते. शेतकऱ्यांनी बाजारातील अनधिकृत बियाणे खरेदी करु नये, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक एन. पी. सिसोदे यांनी केले आहे.

उन्नत शेती, समृध्द शेतकरी या अभियानाचा शुभारंभ हिंगणा तालुक्यातील मोंढा (पांजरी) येथील ग्रामपंचायत भवन येथे कृषी सहसंचालक यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, उपविभागीय कृषी अधिकारी पी.एन. डाखळे, सरपंच रुपाली आदमने, उपसरपंच विनोद शंकरराव काकडे, तालुका कृषी अधिकारी एम. व्ही. परांजपे, एस.व्ही. मलगवडे, व्ही.आर. शिंदे आदी उपस्थित होते.

जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत असून आरोग्य पत्रिकेमध्ये असलेल्या सूचनांचे पालन करुन शेतकऱ्यांनी शेतामध्ये आवश्यक खते व किटकनाशके वापर करण्याची सूचना करताना कृषी सहसंचालक एन.पी. सिसोदे म्हणाले की, खरीप हंगाम हा केवळ पंधरा दिवसाचा असल्यामुळे पाऊस पडल्यानंतर पेरणीची घाई असते. अशावेळी बाजारातील कुठलेही बियाणे खरेदी करु नका. मागील वर्षी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकरिता व शासनाने मान्य केलेले बियाणे खरेदी करा व बियाणे खरीदी करताना पावती घ्या, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी आरआरबीटी, व्हिटगार्ड, बीजी-3, एसटीबीटी तसेच तननाशक बिटी आदी बियाणे खरेदी करु नका व अशा कंपनीचे अनधिकृतपणे बियाण्यांची विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी यावेळी केले. बोंड अळीमुळे मागील वर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत शेतात कपाशी राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगतांना शेंडे म्हणाले की, कापसाचे कमी कालावधीचे बियाणे घेतल्यानंतर हरबरा किंवा इतर रब्बी पिके घेणे सूलभ होणार आहे.


शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत असून शेतकऱ्यांनीही पेरणीपासून ते पिक काढण्यापर्यंत कृषी सहाय्यक तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घ्यावे. पिकांवर फवारणी करताना कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच फवारणी करावी, असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.

हिंगणा तालुक्यात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सोयाबीन प्रकल्प राबविण्यात येत असून 25 शेतकऱ्यांना एकत्र या प्रकल्पासाठी कृषी विभागातर्फे महाबिजकडून बियाणे उपलब्ध करुन देण्यात येते आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. कापूस व तूर ही पिके एकत्र घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शिफारस करण्यात येत असल्योचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी यावेळी सांगितले.