Published On : Thu, May 24th, 2018

माहितीचा खजिना असलेल्या महाराष्ट्र वार्षिकी-2018 चे 25 मे रोजी प्रकाशन

Maharashtra Varshiki-2018 Book
नागपूर: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने महाराष्ट्र वार्षिकी-2018 हा संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. महाराष्ट्र वार्षिकी या ग्रंथाचे प्रकाशन उद्या शुक्रवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते होणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित वार्षिकी प्रकाशन सोहळयास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच नाथे प्रकाशनचे संजय नाथे, पाठक ब्रदसचे श्रीधर गाडगीळ, प्रिमीअर अकाडमीच्या विभा जाधव, आकार फाऊंडेशनचे शिवाजी कदम आदी यावेळी उपस्थित राहतील.

महाराष्ट्र वार्षिकी या संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची विविध क्षेत्राची माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य व संस्कृती तसेच पुरस्कार आदी संपूर्ण माहिती या वार्षिकीच्या माध्यमातून अभ्यासक तसेच विविध स्पर्धा तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन ठरणार आहे.

मंत्री मंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासना संबंधी गेल्या वर्षभरातील घडामोडींचा समावेश असल्यामुळे ते पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणे आवश्यक आहे. या वार्षिकीच्या रुपाने ज्ञान व माहितीचा खजिना वाचकापर्यंत पोहचविण्याचा माहिती व जनसंपर्क विभागाचा प्रयत्न आहे. वार्षिकीची किंमत 250 रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन इमारत क्रमांक 1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर दूरध्वनी क्रमांक 0712-2561979 येथे उपलब्ध आहे. या उपक्रमास अभ्यासक, संपादक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, अधिकारी व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या महाराष्ट्र वार्षिकीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.