नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने गुरुवारी (ता. २४ एप्रिल) राजनगर झोपडपट्टीत पुन्हा बुलडोझर कारवाई करत ५० झोपड्या जमीनदोस्त केल्या. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याआधी १६ एप्रिल रोजी झालेल्या कारवाईत काही झोपड्या अर्धवट पाडण्यात आल्या होत्या, तीच कारवाई यावेळी पूर्णत्वास नेण्यात आली. महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने मंगळवारी (२२ एप्रिल) रहिवाशांना नोटीस देऊन कारवाईचा इशारा दिला होता.
महाविद्यालयाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वार, पूर्वेकडील भाग तसेच पश्चिमेला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या सर्व झोपड्यांवर गुरुवारी सकाळी ६ वाजता कारवाई सुरू झाली. दुपारी दोनपर्यंत सर्व अतिक्रमण हटवण्यात आले. रहिवाशांनी सामान आधीच सुरक्षित स्थळी हलवले होते.
प्रवर्तन विभागाचे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत, अधीक्षक संजय कांबळे व कनिष्ठ अभियंता भास्कर माळवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
दरम्यान, काही महिलांनी या कारवाईला विरोध दर्शवला, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे कारवाई सुरळीत पार पडली. जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने अतिक्रमण हटवण्यात आले.
गड्डीगोदाम चौकात अनधिकृत शेड्सवर कारवाई-
गड्डीगोदाम चौकातील महापालिकेच्या शाळेच्या आवारात अनधिकृतपणे उभारलेले ३-४ शेड्स जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने हटवण्यात आले.
गांधीबाग झोनमधील रस्त्यांवरून ठेले हटवले-
महाल ते इतवारी परिसरातील फूटपाथ व रस्त्यालगत लावलेले अनधिकृत ठेले व दुकाने हटवण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे एक ट्रक एवढे साहित्य जप्त करण्यात आले.