Published On : Fri, Jul 24th, 2015

बुलढाणा : खडकपूणा प्रकल्पातील पाणी सोडल्याने पिकांना नवसंजीवनी

Advertisement


Buldhana Water
चिखली (बुलढाणा)।
पावसाअभावी संपुर्ण जिल्ह्यात खरिपाची पिके कोमेजून जात असल्याचे विदारक चित्र दिसत असुन, शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. बळीराजाला अशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार असुन याची जाणीव असलेल्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीपणामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली. खडकपूर्णा प्रकल्प उपसा जलसिंचन टप्पा क्र. 4 मध्ये पाणी सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांची पिके वाचविण्यात यश आले.

बुलडाणा जिल्ह्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र कमी असल्याने केवळ विहिरी आणि नद्यावरूनच बळीराजाला सिंचनासाठी पाणी मिळते. मात्र चिखलीचे तत्कालीन भारत बोंद्रे यांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीवर मेहकर तालुक्यातील पेनटाकळी येथे पेनटाकळी प्रकल्पाचे काम सुरु झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भारत भाऊंचा पाटबंधारे मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांनी खडकपूर्णा आणि जिगाव प्रकल्पाच्या कामासाठी वेगाने प्रयत्न करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून खडकपूर्णा प्रकल्पाला मंजुरात मिळवूनही घेतली.

खडकपूर्णा प्रकल्पाचे भूमिपूजन ना.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले आणि या खडकपूर्णाचे काम पुर्णत्वाकडे जात असतानाच प्रकल्पातील पाण्याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना होत असल्याचे समाधान या प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक 4 ची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. खडकपूर्णा प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक 4 चा लाभ हा पुर्णपणे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. यामध्ये तालुक्यातील भरोसा, रामनगर, रोहडा, गांगलगाव, कवठळ, मुरादपूर, देऊळगाव घुबे, अमोना, कोनड, कोलारा, भालगाव अश्या गावांना या टप्प्याचा लाभ होणार आहे. काहींना आजच होत आहे. यावर्षाी मृग नक्षत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानंतर महिनाभरापासून पावसाने उघाड दिल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडला होता. अश्यातच भारत बोंद्रे यांनी अमरावती विभागीय आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करुन या परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पाणी सोडण्याबाबत चर्चा केली आणि 9 जुलैपासून खडकपूर्णा प्रकल्प उपसा जलसिंचन टप्पा क्र. 4 मध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील जवळपास सहा हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली. भविष्यामध्ये संपूर्ण क्षमतेने या टप्पा क्र. 4 मधून तालुक्यातील जवळपास 11 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे, अशी माहिती यावेळी माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी दिली. या पाहणी दौऱ्या दरम्यान भारत बोंद्रे, अँड.विजय कोठारी, रामकृष्ण शेटे, माजी प्राचार्य गुलाबराव खेडेकर, श्रीराम घोरपडे, राजू भगत, प्रशांत एकडे यांच्यासह पत्रकार आणि परिसरातील गावकरी उपस्थित होते.