Published On : Fri, Jul 5th, 2019

समाजातील सर्व वर्गाला स्पर्श करणारे अंदाजपत्रक : ऊर्जामंत्री बावनकुळे

Advertisement

मुंबई/नागपूर: देशातील, शेतकरी, मध्यमवर्ग, गरीब, नोकरदार, व्यापारी आदींना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीकडे नेणारे हे अंदाजपत्रक असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून ते सादर केले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण भारतातील 3 कोटी गावे डिजिटल साक्षर करून सर्व जगाशी ग्रामीण भागास जोडण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे

5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून अर्थमंत्रयांनी मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना दिलासा दिला आहे. सन 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी योजना आणण्याचा प्रयत्न, तसेच जोडधंदा म्हणून डेअरीच्या उत्पन्नात वाढ करण्याची योजना, ही शेतकऱ्यांना आर्थिक विकासाकडे घेऊन जाणारी आहे. नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणासाठी 400 कोटींची तरतूद आतापर्यंत प्रथमच करण्यात आली.

शेतीच्या विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवून शासनही गुंतवणूक करणार, तसेच शून्य खर्चातील शेतीला प्रोत्साहन हा निर्णय स्वागतार्ह आहे. नारी तू नारायणी- हा नवा नारा महिलांचा विकास साधणारा आहे.

सन 2022 पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला वीज कनेक्शन देऊन गरिबांचा घरातील अंधार नाहीसा होणार आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घरे बांधायचे लक्ष्य गरीबाच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविणारा निर्णय आहे.

तसेच हर घर जल या योजनेतून समाजातील सर्वच वर्गातील लोकांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जा निर्मितीत 10 टक्के वाढ हा सौर उर्जेला प्रोत्साहन देणारा निर्णय, येत्या 5 वर्षात 80 हजार कोटींची सव्वा लाख किमी रस्ते बांधून दळणवळण सुधारणार व देशांच्या प्रगतीचे रस्ते अधिक मजबूत होणार असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.