नागपूर: बुद्धपौर्णिमेला सोमवार, ३० एप्रिलला कामठी मार्गावरील जसवंत टॉकीज मागील बुद्धनगरात ‘बुद्ध पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे सलग तिसरे वर्ष असून, यावेळी प्रसिद्ध् संतुरवादक वाल्मिक धांदे यांचे संतुरवादन व प्रसिद्ध् गायक प्रा. डॉ. अनिल खोब्रागडे यांचे बुध्द भीम गीतांचा कार्यक्रम होईल. पहाटसुरात संतुरचा ताल व गायनाचे सूर नागरिकांना ऐकता येईल. गायिका छाया वानखेडे-गजभिये यांचे हे आयोजन आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत पहाटे ५.३० वाजता बुध्दवंदनेनंतर कार्यक्रमास सुरूवात होईल.
पहाटेच्या स्वच्छ वातावरणात ताल व सूर ऐकण्याचा आनंद यानिमीत्ताने घेता येईल. दोन सत्रात होणाऱ्या कार्यक्रमाची सुरूवात अगदी पहाटे सुरू होते. प्रारंभी शास्त्रीय वाद्याविष्कार सादर होतो. त्यानंतर दुसऱ्या सत्रात बुध्दगीते सादर करण्यात येते. यावेळी २०१७-१८ चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध् संतुरवादक वाल्मिक धांदे यांचे लयकारी संतूरवादन ऐकता येईल. ऐन तरूणपणात तबल्याच्या प्रेमात पडलेले धांदे यांनी १५ वर्षे तबल्यावर एकहाती हुकूमत गाजविली. पुढे सुरांच्या संगतीत त्यांचे मन संतूर या काश्मिरी वाद्याकडे आकर्षित झाले. त्यांनी या वाद्याचा विधीवत अभ्यास सुरू केला. प्रारंभी पंडित कार्तिक कुमार यांच्याकडे त्यांनी रागदारीचे धडे घेतले. पण, आणखी शिकण्याच्या इच्छेपोटी त्यांनी जगप्रसिद्ध् संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांचे संतूरवादन बहरत गेले. आज त्यांच्याकडे संतूर शिकण्यासाठी देशविदेशातील शिष्यांची रिघ लागली आहे. २००४ साली तुर्कस्थानातील इस्तंबूल येथे झालेल्या स्टेट सिम्फनीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. वाल्मिक धांदे हे आकाशवाणी, दूरदर्शनचे ‘अ’श्रेणीचे कलावंत आहेत.
संगीत विशारद असलेले व प्रसिद्ध् मॉरीस कॉलेज येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले प्रा.डॉ. अनिल खोब्रागडे हे नागपुरच्या संगीत क्षेत्रातील मोठे नाव आहे. गालीबरत्न, डॉ. आंबेडकर महाष्ट्रभूषण संगीतरत्न व इतर पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करण्यात आले. संगीत या विषयात त्यांनी पी.एचडी केली आहे. प्रा. खोब्रागडे हे देखील आकाशवाणी, दुरदर्शनचे ‘अ’श्रेणीचे कलावंत आहेत. त्यांनी ‘हलाहल’ या चित्रपटात गायन केले. यासोबत काही अन्य चित्रपटातील गीतांनाही त्यांच्या आवाजाचा गोडवा मिळाला आहे. अनेक सीडीजमध्ये त्यांनी गायन केले आहे. आंबेडकरी चळवळीतील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे स्वतंत्र अशी ओळख असून, त्यांनी अनेक बुध्द भीम गीतांचे गायन केले आहे. युरोप खंडातील बहुतांश देशात त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. नागपुरातील तरूण संगीतकार भुपेश सवाई हे या कार्यक्रमाचे संगीत संयोजक आहेत. रेला रे, लास्ट बेंचर्स, संध्यासावट या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे.
यासोबतच अनेक प्रायव्हेट अल्बम व महानाटयांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. महासुर्य, तथागत, रमाई, संत कबीर, माईसाहेब यांच्यासह जवळपास ३० च्या वर महानाटयाचे ते संगीतकार आहेत. ते स्वत: उत्कृष्ट गायकही आहेत. आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक अशोक जांभुळकर हे कार्यक्रमाचे निवेदक आहेत. एक उत्कृष्ट उद्घोषक म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूरच्या आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक नाटकात त्यांनी स्वत: काम केले असून, कलावंतांना घडविण्याचे कामही त्यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा संगीतप्रेमींनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक गायिका छाया वानखेडे-गजभिये, महानंदा वानखेडे, माया नगरकर, आकाश नगरकर, सुमेधा नगरकर, उर्मिला वानखेडे,नयना नगरकर, चिराग वानखेडे, युगंधरा वानखेडे, चारूकेशी वानखेडे, विजय वानखेडे, मेघा वानखेडे, अभिरूची देशमुख,नरेश वाहाणे, राजन वाघमारे, सम्यक थिएटरचे नरेश साखरे, प्रमोद कुमार, वैशाली गोस्वामी, सुरेश खोब्रागडे, श्रीकृष्ण ढोले यांनी केले आहे.
कलाकारांचा सन्मान
कलावंतांकडून कलावंतांचा होणारा सन्मान महत्त्वाचा आहे. बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना गायिका छाया वानखेडे-गजभिये यांचा हा छोटासा प्रयत्न आहे. पहिल्या वर्षी त्यांनी इतर कलावंतांना सोबत घेऊन बुद्धपहाटची सुरुवात केली. गेल्यावर्षी पं. धाकडे गुरूजी, तबलावादक संदेश पोपटकर, सतारवादक नासीरखान यासारख्या दिग्गज वाद्य कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावर्षी वाल्मिक धांदे, प्रा. अनिल खोब्रागडे यांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात येईल. वैयक्तिक पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. त्याला नागरिक मोठा प्रतिसाद देत असल्याने हा कलाकारांचा मोठा सन्मानच म्हणावा लागेल.