नागपूर -खापरी पुनर्वसन परिसरात एका धक्कादायक प्रकारात मोठा भाऊच लहान भावाचा मारेकरी ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. दारूच्या व्यसनामुळे निर्माण झालेल्या सततच्या वादाला कंटाळून एका व्यक्तीने आपल्या लहान भावाची चाकूने भोसकून हत्या केली. हा प्रकार २५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडला.
खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव हरीश शेषराव जुमडे (४०) असून, त्याने आपल्या लहान भावावर वैभव शेषराव जुमडे (३७) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना प्लॉट नं. ७७, सेक्टर २६, खापरी पुनर्वसन परिसरात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत वैभवला दारूचे अतिव व्यसन होते. तो सतत आपल्या भावाला, वहिनीला आणि पिल्लांना शिवीगाळ करत असे. घटनेच्या दिवशी त्याने नशेत वहिनीला मारहाण केली होती. त्यामुळे हरीशने त्याला जाब विचारला असता, वैभवने त्याच्यावरही अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतप्त हरीशने धारदार शस्त्र घेऊन त्याच्या गळ्यावर वार केला, ज्यात वैभवचा मृत्यू झाला.
घटनेनंतर हरीश जुमडे स्वतः बेलतरोडी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता (BNS) कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
पोलिस उपनिरीक्षक अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे खापरी पुनर्वसन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.