Published On : Tue, Apr 25th, 2017

घरकुल योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजूंना पोहोचवा : चेतना टांक

Advertisement

Galich vasti meeting phtos 25 April (2)
नागपूर :
नागपूर शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनांचा लाभ जास्तीत जास्तीज गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती चेतना टांक यांनी दिले.

मंगळवार दिनांक २५ एप्रिल रोजी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात समितीची पहिली आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी उपसभापती वंदना यंगटवार, समिती सदस्या रुतिका मसराम, दुर्गा हत्तीठेले, मंगला खेकरे, स्नेहा निकोसे, सदस्य मनोज सांगोळे उपस्थित होते. बैठकीत सभापती चेतना टांक यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला. महाराष्ट्र शासनाच्या विशेष जिल्हा समाज कल्याण विभागाची नागपूर शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनेचे क्रियान्वयन एजंसी म्हणून नागपूर महानगरपालिका करते.

समाज कल्याणविभागाद्वारे ४७३७ लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेस योजनेच्या अंमलबजावणीकरिता हस्तांतरीत करण्यात आली . त्या यादीचे मनपाद्वारे सर्वेक्षण केले असता सर्वेक्षणादरम्यान ३०४९ लाभार्थी आढळून आले. ही योजना राबविण्याकरिता विशेष जिल्हा समजाकल्याण अधिकारी, नागपूर यांच्याकडून एकूण १४९०.६० लक्ष निधी मनपाला उपलब्ध करुन देण्यात आला. यामध्ये एकूण ७०५ लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर यांनी दिली. हा निधी अपुरा असल्यामुळे शासनाकडे २५ कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. तो निधी समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला असून मनपाला लवकरच तो निधी प्राप्त झाल्यावर उर्वरीत लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. चेतना टांक यांनी बैठकीत या निधीचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिलेत.

याप्रसंगी रमाई आवास योजना, महिलांकरीता सार्वजनिक ठिकाणी विशेष शौचालयांच्या निर्मितीची योजना, ‘पैसे द्या व वापरा’ तत्वावरील सार्वजनिक शौचालयांची निर्मिती, मागासवर्गीय कल्याण विशेष समिती अंतर्गत दुर्बल घटक योजना इत्यादीबाबत चेतना टांक यांनी विस्तृत माहिती जाणून घेतली. या सर्व योजनांविषयी एक प्रोजेक्ट मॉडेल तयार करण्यासोबतच समितीचे सर्व सदस्य, वरील योजना सुरू असलेल्या ठिकाणी भेट देतील असे सांगितले.

बैठकीला कार्यकारी अभियंता, विविध झोनचे सहायक अभियंता, उप अभियंता आदी उपस्थित होते.

घ्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ

याप्रसंगी चेतना टांक यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजूंनी मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन केले. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही तसेच ज्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्ष्रा कमी आहे अशा घटकांनी कोणत्याही इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन किंवा ज्यांच्या घरीच इंटरनेटची सुविधा आहेत त्यांनी या योजनेचा ऑन-लाईन फॉर्म भरुन लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.