Published On : Thu, Jul 11th, 2019

महिलांद्वारा अवैध देशी दारू तस्करीचा डाव उधळला

Advertisement

नागपूर: -प्रवासाचे वाहन बदलवून देशी दारूची तस्करी करीत असलेल्या महिलांचा डाव बुटीबोरी पोलिसांनी उधळून लावल्याची घटना दि.१० जुलै बुधवार ला दु.४:०० च्या दरम्यान बुटी बोरी बस स्थानक चौकात बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

सविस्तर माहीती असे की, आरोपी रुक्साना इम्रान शेख (३०),दिपमाला संदेश गोंगले (३६),छाया भीमराम धाडसे (५२),माया भीमराव ताकसांडे (५५), कुसुम रामपल्ली (५५), पाचही राहणार चंद्रपूर ह्या महिला नागपूर येथून खाजगी ट्रॅव्हल्स मधून अवैध देशी दारूची तस्करी करीत असल्याची माहिती गोपनीय सूत्राच्या आधारे बुटीबोरी पोलिसांना मिळताच पो.नि.आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि.अमोल लगड,पो ह मिलिंद नांदूरकर,सतेंद्र रंगारी,राजू कापसे,राकेश तालेवार आणि महिला कर्मचारी योगिता खापेकर यांनी बुटीबोरी बस स्थानकावर सापळा रचला.

आरोपी महिला आपल्या प्रवासाचे वाहन बदलविण्याकरिता ट्रॅव्हल मधून उतरल्या असताना सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांचे बिंग फुटले.महिला पोलीस कर्मचाऱयांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅग मधे आणि त्यांच्या पायाला सेलो टेप च्या साहाय्याने देशी दारूच्या ९० मिली च्या ४८० निपा आढळून आल्या.आरोपी महिलांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून १४ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांचेवर मुदाका अनव्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहे.

महिलांद्वारा चंद्रपूर येथे दारूच्या तस्करीची ही दुसरी घटना असून संबधित घटनेबद्दल परिसरात तर्क वितर्कला उधाण आले आहे.या आधी मार्च महिन्यात देखील चंद्रपूर येथील दोन महिलांकडून देशी दारूचा १२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

संदीप बलविर,बुटी बोरी