Published On : Fri, Jun 8th, 2018

भूमीपुत्रांच्या जमिनी बळकविणारे हात तोडू -उद्धव ठाकरे

Advertisement

पालघर : केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवे, फ्रेट कॅरिडोर याप्रकल्पाचा विरोध शिवसेनेकडून सातत्याने होतो आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भूमिपुत्रांच्या बाजूने उभे ठाकले आहे. या प्रकल्पासाठी भूमीपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने बळकविणारे हात शिवसेना तोडून टाकेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पालघर जिल्हयातील वनगापाडा येथील जाहीर सभेत केली. नुकताच संपन्न झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेचे कार्य करणाऱ्या शिवसैनिक व पदाधिकारी यांना धन्यवाद देण्यासाठी येथे आयोजिलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, बुलेट ट्रेनबाबत जी जनसुनावणी घेतली. मात्र त्यामध्ये जर जनतेच्या भावनांचा आणि मांडलेल्या मतांचा विचारच केला जाणार नसेल तर ती घेण्यात अर्थ काय? संपूर्ण अहवाल इंग्रजीत असल्याने त्याची माहिती जनतेला होणार कशी? त्याबाबतचे आक्षेप नोंदवणार तरी कसे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

१९९६ मध्ये युतीचे सरकार असतांना वाढवण बंदर उभारण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. परंतु या बंदराला भूमिपुत्रांचा प्रचंड विरोध होता. तेव्हा बाळासाहेबांनी वाढवणला जाऊन जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी मला पाठविले होते. पाहिजे तर आमच्यावर गोळ्या झाडा पण आम्हाला हे बंदर नको आम्ही ते होऊ देणार नाही. अशा त्यांच्या भावना त्या शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहचवल्या, तेव्हा त्यांनी ताबडतोब ते बंदर रद्द करायला लावले अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. ११ आंदोलक गोळीबारात ठार झाल्यानंतर तामिळनाडूमधील स्टरलाईट प्रकल्प रद्द केला गेला. लोकांचे रक्त सांडल्याशिवाय सरकारला त्यांच्या भावनांची तीव्रता कळत नाही काय? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.