नागपूर : नेहमीच परखड मतं मांडणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात आपल्या जातीचा उल्लेख करत महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्राह्मण समाजाची स्थिती मोकळेपणाने मांडली. मी ब्राह्मण असूनही महाराष्ट्रात आमच्या समाजाला फारसं महत्त्व दिलं जात नाही, असे सांगून त्यांनी राज्यातील सामाजिक वास्तव अधोरेखित केलं.
गडकरी पुढे म्हणाले, “उत्तर भारतात मात्र ब्राह्मण समाजाला मोठं राजकीय वजन आहे. दुबे, चतुर्वेदी यांसारख्या नेत्यांना तिथे विशेष महत्त्व मिळतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर आम्हाला तुमच्यासारखा नेता मिळाला, असं एकदा मला सांगण्यात आलं. पण मी स्पष्ट केलं की मी कोणत्याही एका समाजाचा नेता नाही – मी सर्वांचा आहे.”
या कार्यक्रमात गडकरी यांनी शिक्षणाच्या भूमिकेवर भर देत, “गुण हे यशाचं एकमेव मापदंड नसतात. शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे,” असं ठामपणे सांगितलं. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व भाषांचं शिक्षण घेण्याचं आवाहनही केलं.
देशात सध्या भाषा, जात, धर्म यावरून सामाजिक मतभेद तीव्र होत असताना गडकरींनी या साऱ्या गोष्टींपलीकडे पाहण्याचा आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारण्याचा संदेश दिला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.