Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

ब्रह्मपुरीतील अवैध रेती उत्खननाचा मुद्दा विधानसभेत गाजला; दोषींवर कठोर कारवाईची आमदार दटकेंची मागणी

Advertisement

नागपूर : भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील अवैध रेती उत्खनन आणि तस्करीचा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रेती घाटांवर परवानगीची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

दटके यांनी सांगितले की, या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे करण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी केली, तर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे संबंधितांवर तब्बल ५५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, दंडाची रक्कम न भरताच अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

मार्च २०२६ मध्ये ब्रह्मपुरी रेती घाटांच्या लिलावासंदर्भात दटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २०२५-२६ आणि २०२६-२७ या कालावधीतील लिलाव, कार्यादेश, करार, रेती साठा, रॉयल्टी व पर्यावरणीय मंजुरीची माहिती मागवली होती. त्यानुसार संबंधित कागदपत्रे त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.

चर्चेदरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व रेती घाटांवरील अवैध उत्खननाच्या चौकशी अहवालानुसार दोषींवर कारवाई होणार का आणि आकारलेला संपूर्ण दंड वसूल केला जाणार का, असा प्रश्न दटके यांनी उपस्थित केला.

Advertisement

यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित प्रकरणातील अहवालाची पुन्हा सखोल तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पुढील निर्णय नियमानुसार घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभेत दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.