Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वाराणसी-नागपूर रेल्वे प्रवासात महिला छेडछाडीचा आरोप; अल्पवयीनाला मारहाण

रेल्वे यंत्रणेवर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप
Advertisement

नागपूर : वाराणसीहून नागपूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबाचा आरक्षित रेल्वे प्रवास भयावह ठरल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वेत काही अज्ञात तरुणांनी २९ वर्षीय महिलेशी छेडछाड केल्याचा, शिवीगाळ व धमक्या दिल्याचा तसेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाने नागपूर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रेल्वे हेल्पलाईन, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि तिकीट तपासनीस (टीटीई) यांनी मदतीसाठी वारंवार विनंती करूनही कोणतीही प्रभावी कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तक्रारीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता कुटुंब दानापूर एक्सप्रेस (क्रमांक १२७९२) च्या एस-४ डब्यात वाराणसीहून नागपूरकडे प्रवासासाठी चढत असताना गर्दीचा फायदा घेत सुमारे सहा अज्ञात व्यक्तींनी महिलेशी कथित छेडछाड केली. याला विरोध केल्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलाला मारहाण करत शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर तातडीने १३९ रेल्वे हेल्पलाईनवर तक्रार करण्यात आली. त्यानंतर आरपीएफचे जवान रेल्वेत आले, मात्र संबंधितांकडे वैध तिकीट असल्याचे सांगत कोणतीही ठोस कारवाई न करता निघून गेल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

यानंतर कुटुंबाने टीटीईकडेही मदतीची मागणी केली. सतना स्थानकावर व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, सतना स्थानकात कुटुंबालाच रेल्वेतून खाली उतरविण्यात आले. दरम्यान, रेल्वे सुटू लागल्याने त्यांनी धावपळ करून पुन्हा डब्यात प्रवेश केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Advertisement

वाराणसी ते सतना या प्रवासादरम्यान सतत मानसिक त्रास सहन करावा लागला असून सुरक्षा देण्यात आली नाही तसेच आरोपींविरुद्ध कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

या प्रकरणात अज्ञात आरोपींसह कर्तव्यात कथित हलगर्जीपणा करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित टीटीईवरही कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे.

दरम्यान, नागपूर रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौरव गावंडे यांनी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. घटनेबाबत वाराणसी किंवा मार्गातील अन्य रेल्वे स्थानकावर तक्रार नोंद झाली होती का, याची पडताळणी सुरू आहे. तसेच टीटीईने लेखी तक्रार स्वीकारली असल्यास त्याचाही तपासात विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घटना वाराणसी जीआरपीच्या कार्यक्षेत्रातील असल्याने पुढील तपास संबंधित जीआरपीकडे वर्ग केला जाणार असून, तपास अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.