नागपूर – उपराजधानी नागपूरमधील सेमिनरी हिल परिसरातील CGO (Central Government Offices) कॉम्प्लेक्सला बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर नागपूर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली असून, पोलीस तात्काळ तपासासाठी घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी CGO कॉम्प्लेक्सच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या स्फोटक व सुरक्षा विभागाला एक ई-मेल प्राप्त झाला, ज्यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. या ई-मेलची माहिती मिळताच तात्काळ गिट्टीखदान पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मात्र, प्राथमिक तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद सापडले नाही.
सेमिनरी हिल येथील CGO कॉम्प्लेक्समध्ये केंद्र सरकारच्या विविध खात्यांचे कार्यालय आहे. यात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), प्रादेशिक पोस्ट ऑफिस, केंद्रीय जल आयोग यांसारख्या विविध महत्त्वाच्या शासकीय संस्था कार्यरत आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो कर्मचारी काम करतात.
केंद्र सरकारच्या कार्यालयाला धमकी मिळाल्याने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांकडून सतत चौकशी सुरू आहे. धमकी कोणी आणि का दिली, याचा तपास सुरू असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.