नागपूर – शहरातील गोवारी उड्डाणपूलावरील हाइट बॅरियरमुळे अपघातांची मालिका सुरुच असून, हे ठिकाण जणू अपघातांचे नवे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. अशाच एका ताज्या अपघातात ट्रकने हाइट बॅरियरवरील बोर्ड वाचून गती कमी केली असता, पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना काल रात्री घडली. एक काँक्रीट भरलेला ट्रक गोवारी उड्डाणपूलावरून जात असताना चालकाच्या लक्षात हाइट बॅरियर आणि त्यावरील सूचनाफलक आला. त्याने तात्काळ ट्रकची गती कमी केली. मात्र, त्याचवेळी मागून आलेली एक वेगवान कार थेट ट्रकच्या मागच्या भागावर आदळली.
या अपघातानंतर दोन्ही चालकांमध्ये थोडीशी बाचाबाची झाली. पण शेवटी परस्पर समजुतीने प्रकरण मिटवण्यात आले. तरीही अपघातामुळे कार व ट्रक दोन्हींचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनाने हाइट बॅरियरची उंची कमी केली असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु त्यासंबंधी कुठेही स्पष्ट सूचना लिहिलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांना माहिती न मिळाल्यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत.
अशा अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने, आता नागपूर प्रशासनाने योग्य ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावणे आणि बॅरियरची माहिती देणे आवश्यक झाले आहे. अन्यथा हे ठिकाण अपघातांच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरू शकते.