Published On : Wed, Jul 24th, 2019

बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

Advertisement

नागपूर : रूग्णांचे हित जपणे सर्वात अत्यावश्यक असल्याने जिल्ह्यातील विनानोंदणीकृत खासगी व बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस वैद्यकीय व्यवसायींवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणा-या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर तसेच आरोग्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, अनेक बोगस वैद्यकिय व्यवसायिक शहर व ग्रामीण भागांत दिशाभूल करणा-या जाहिराती बेकायदेशीरपणे लाऊन रूग्णांची फसवणूक करताना आढळतात. अशांवर संबंधित यंत्रणांनी त्वरित कडक कारवाई करावी. ग्रामीण व शहरी हद्दीतील बोगस वैद्यकीय व्यवसायिकांची माहिती यंत्रणांनी समितीसमोर वेळोवेळी ठेवणे आवश्यक आहे. अधिका-यांनी तत्परतेने याची नोंद घ्यावी.

अधिका-यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोणतीही व्यक्ती बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार नाही याची खात्री करावी. गावात भेट देवून कोणीही व्यक्ती बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत नाही याची खात्री करावी. विनानोंदणी वैद्यकीय व्यवसाय करणारे आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणा-यांविरुद्ध रितसर कार्यवाही पोलिसांनी करावी, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा नियमित आढावा घेण्यात यावा. पॅथॉलॉजी लॅबची नोंदणी असणे गरजेचे असून यासंदर्भात संबंधित विभागाने तपासणी करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी श्री.मुदगल यांनी दिले.

बोगस वैद्यकिय व्यवसाय करणा-यांविरूद्ध 2017-मध्ये 4 तर 2018-मध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून तालुकास्तरीय समितीकडे दाखल झालेल्या तक्रारींवरही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.