Published On : Wed, Jul 24th, 2019

शालेय कामकाजाचे दिवसात शिक्षकांना मतदार याद्यांच्या कामाची सक्ती

निवडणूक आयोगाच्या निर्देशा कडे डोळेझाक.

कन्हान : – नुकत्याच शाळा सुरू व्हायला महिन्यांचा कालावधी होत असून शिक्षकांनी अध्यापन कार्याला वेगाने सुरूवात केली. मात्र संबंधित कार्यालया कडून शिक्षकांना कुठे तलाठ्या मार्फत तोंडी आदेश, तर कुठे शिक्षकांच्या व्हाट्सअप वर मेसेज पाठवुन ऐन शालेय कामकाजाच्या दिवसात मतदार याद्यांचा कामाची सक्ती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, ‘अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा तर्फे शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांना बीएलओ ची कामे देऊ नका अशी मागणीचे लेखी निवेदन नुकतेच तहसीलदार पारशिवनी यांचेकडे देण्यात आले.

आर टी ई अॅक्ट २००९ नुसार शिक्षकांना निवडणूक, दशवार्शिक जनगणना व आपत्ती निवारणाची कामे याशिवाय अन्य कामे देता येत नाही. तसेच भारत निवडणूक आयोग दिल्ली चे ५ सप्टेंबर २०१६ चे पत्रानवये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचा संदर्भ देत शिक्षकांना मतदार यादीची कामे द्यावयाची झाल्यास Non-teaching day and within non teaching hours मध्येच देता येतील असे निर्देश राज्यांचे निवडणूक आयोगा ला दिलेले आहेत. पण या आदेशाकडे संबंधित विभागाकडुन डोळेझाक करत शालेय कामकाजाच्या दिवसात मतदार याद्याचे कामाची सक्ती केली जात आहे.

अशा १५ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत हे काम करायचे आहे. या कालावधीत शिक्षकांनी शाळेत जाऊन अध्यापन करायचे की मतदार यादीची कामे करायची हा प्रश्न शिक्षका समोर उपस्थित झाला आहे. सतत एक महिना शिक्षक मतदार यादीचेच काम करीत राहीला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां चे काय..? याचा विचार संबंधित विभाग व जिल्हा परिषद प्रशासनही करतांना दिसत नाही.

सध्या शालेय कामकाजाचे दिवस असल्यामुळे या कामासाठी शिक्षकां ऐवजी अन्य पर्यायाचा विचार करावा अशा मागणीचे निवेदन ‘अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा तर्फे तहसीलदार पारशिवनी यांना देण्यात आले, संघटनेच्या प्रतिनिधी मंडळात धनराज बोडे, अनिल पाटील, ओमदेव मेश्राम, संजय ढोके, विभा वांदीले, सुरज बागडे, जयदेव शिवुरकर प्रामुख्यने उपस्थित होते.