Published On : Mon, Sep 10th, 2018

नागपुरात पहिल्यांदाच निघाली पत्नीपीडित पुरूषांची वेदना व्यक्त करणारी भुरी मारबत

Advertisement

नागपूर: संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नागपुरातच निघणारी मारबतीची मिरवणूक सोमवारी काढण्यात आली. 137 वर्षांची परंपरा लाभलेली मारबत मिरवणूक नागपुरचे वैशिष्ट्य आहे. मारबतीला चालू घडामोडींवर भाष्य करणारे निघणारे बडगे आकर्षणाचे केंद्र होते. यावर्षी पहिल्यांदाच पत्नीपीडित तसेच पुरूषांना खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या महिलांचा निषेध करणारी व पुरूषांचे दु:ख व्यक्त करणारी भुरी मारबत आकर्षणाचे केंद्र होती.

498-अ, घरगुती हिंसाचार, विनयभंग, बलात्कार, घटस्फोट, खावटी, चाईल्ड कस्टडी आदी प्रकरणांत पुरूषांना पोलिस आणि न्यायालयीन कारवाईत अडकवले जाते. पक्षपाती कायद्यांचा दुरूपयोग करून निर्दोष व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या महिलांचा निषेध म्हणून भुऱ्या मारबतीची मिरवणूक जेंडर इक्वॅलिटी ऑर्गनायझेशनचे सचिव विक्रांत अंभोरे यांच्या पुढाकाराने काढण्यात आली.

“मुलीला पळवून आणण्यासाठी मी मदत करीन’ असे बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम, हजारो कोटींचा पीएनबी घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हीरे व्यापारी निरव मोदी, पेट्रोल-डिझेलच्या भडकलेल्या दरामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. त्याचा निषेध करणारा बडग्यांनी लक्ष वेधून घेतले. “वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’ अशी घोषणा देत आसमंत दणाणून टाकीत हा बडग्या काढण्यात आला. विदर्भ क्रांती दलातर्फे काढण्यात आलेल्या बडग्याने वेगळ्या विदर्भाची मागणी रेटली. या शिवाय महापालिकेच्या कारभारावर बोचरी टिका करणारे बडगेही काढण्यात आले.

नागपूरात या उत्सवाला सदाशिवराव ताकितकर यांनी 1885 मध्ये सुरूवात केली. मूर्तिकार गणपतराव शेंडे यांनी मारबती प्रत्यक्षात साकारल्या आहेत. शेंडे घराण्यातील तिसरी पिढी मारबती तयार करण्याचे काम करीत आहे. काळ्या मारबतीला 137 वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला 133 वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. त्यावेळी देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने 1885 मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली होती.

बाकाबाईच्या निषेधार्थ काळी मारबत
पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या 137 वर्षांपासून इतवारी परिसरातील नेहरू पुतळ्यापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात येते. सुरूवातीला आप्पाजी मराठे काळी मारबतचा उत्सव साजरा करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजाची सत्ता होती. त्यांच्या जुलमी कारवायांमुळे जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध म्हणून 1881 पासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात येते.