Published On : Mon, Sep 10th, 2018

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकीटाचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : भारतीय डाक विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ या योजनेंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले. या तिकिटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार सदा सरवणकर, आमदार अनिल परब, कोषाध्यक्ष सुमंत घेसास यांच्यासह सर्व विश्वस्त, खासदार राहुल शेवाळे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार, श्रीमती रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर शिवसेना सचिव, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, श्री सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. मी श्री सिद्धिविनायक चरणी महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली आहे. श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत राहिल. हे तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल.


यावेळी पोस्ट विभाग व श्री सिद्धिविनायक न्यास संस्थेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

या योजनेंतर्गत भक्तांना आपला स्वतःचा, परिवाराचा, मित्रांचा, नातेवाईक यांचा फोटो श्री सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करुन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.