Published On : Tue, Jul 24th, 2018

भारतीयांचे स्विस बँकेतील काळ्या पैशाचे प्रमाण 80 टक्क्यांनी घटले

नवी दिल्ली: भारतीयांच्या काळ्या पैशाचे स्विस बँकेतील प्रमाण 80 टक्क्यांनी कमी झाले असून हा सर्व काळा पैसा नसल्याचे स्विस बँकेने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे 2017 मध्ये भारतीयांच्या कर्ज आणि डिपॉझिटच्या रकमेतही 34.5 टक्क्यांनी घट झाल्याचे स्विस बँकेने म्हटले आहे.

ही सर्व उलाढाल मोदी सरकारच्या काळातील असल्याने मोदी सरकारवर टीका करणा-या विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे. स्विस बँकेत भारतीयांच्या गुंतवणुकीत 50 टक्क्यांननी वाढ झाल्याचे वृत्त आल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकावर टीकेची झोड उठवली होती.

२०१६ मध्ये गैर बँकिंग कर्जाचा आकडा ८० कोटी डॉलर एवढा होता. तो २०१७ मध्ये घटून ५२.४ कोटी डॉलर एवढा झाला आहे, असे स्विस बँक बीआयएसने म्हटले आहे. एनडीए सरकारच्या काळात स्विस बँकेतील गैर बँकिंग कर्ज आणि ठेवीमध्ये प्रचंड घट झाली आहे.

२०१३ ते २०१७ दरम्यान त्यात ८० टक्के घट झाली असल्याचं बँकेने म्हटले आहे. स्विस बँकेत भारतीयांची ५० टक्के रक्कम वाढली असल्याचा एक अहवाल नुकताच आला होता.

त्यामुळे नोटाबंदीनंतरही स्विस बँकेत काळापैसा वाढल्याची टीका करत विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. मात्र स्विस बँकेने जारी केलेल्या या अहवालामुळे मोदी सरकारच्या काळात या बँकेत भारतीयांचे काळ्या पैशांची गुंतवणूक करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे उघड झाले आहे.