Published On : Tue, Jul 2nd, 2019

काळा दिवस पाळून रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध

Advertisement

डीआरएम कार्यालय परिसरात काळ्या फिती लावून दिल्या घोषणा

नागपूर: रेल्वेच्या खासगीकरण करण्याच्या धोरणाविरुध्द नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे (एनआएमयू) मध्य रेल्वे नागपूर विभागात सोमवारी काळा दिवस पाळण्यात आला. आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनच्या निर्देशानुसार नागपूर विभागात सर्वत्र काळादिवस पाळण्यात आला.

विविध धरण्यासह अन्य उपक्रमांद्वारे खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. डीआरएम कार्यालयासमोरही कर्मचाºयांनी हातात काळे झेंडे घेऊन आणि काळ्या फिती लावून प्रशासना विरोधात घोषणा दिल्या. संघटनेचे केंद्रीय महामंत्री वेणू नायर कर्मचाºयांना संबोधित करताना म्हणाले की, सरकारचे प्रत्येक पाऊल रेल्वेचे खच्चीकरण करण्याच्या दिशेने पडत आहे.

रेल्वे मंत्रालयाने १०० दिवसांचा कार्यक्रम तयार केला तर कारखान्यांच्या खासगीकरणावर प्राधान्यक्रमाने भर दिला आहे. यामुळे रेल्वेकडून उत्पादित होणारे साहित्य महाग होतील. सोबतच बेरोजगारी आणि सामाजिक असमानताही वाढेल. चुकीच्या धोरणांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. नागपूर विभागाचे सचिव हबीब खान म्हणाले की, सरकारने आयआरसीसीटीच्या माध्यमातून दोन रेल्वेगाड्या खासगी हातात सोपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा खासगीकरणाचाच एक भाग असून त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

धरणे आंदोलनात नरेंद्र धानफुले, मनोज चौथानी, नितिन समर्थ, भगवान आंजकर, अजय रगडे, संजय देशमुख, योगेश मंडपे, प्रमोद बोकडे, आसिफ अली, दुर्गा डकाह, देबाशीश भट्टाचार्य, ई. वी. राव, बिपिन पाटिल, मनोज गायकवाड, ममता राव, लक्ष्मी जंगेला, इजरार हुसैन, संजय भोयर, सुनील कापटे आदींचा समावेश होता.