Published On : Tue, Jul 2nd, 2019

रेल्वे स्थानकावरील जननाहारला पुन्हा कुलूप

Advertisement

जनता खान्यासाठी प्रवाशांची भटकंती

नागपूर: नागपूर रेल्वे स्थानकावरील जनाहारला सोमवारपासून पुन्हा कुलूप लागले. वाजवी दरात खाद्य पदार्थ उपलब्ध होत असल्याने गरीब आणि गरजू प्रवाशांना ते वरदानच ठरले आहे. मात्र, कंत्राट संपल्याने सोमवारपासून जनआहारची सेवा बंद करण्यात आली.

प्रवाशांच्या सुविधेसाठी आयआरसीटीसीकडून अत्यंत कमी शुल्कात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाते. गरीब व गरजू प्रवाशांसाठी ही सुविधा फारच उपयुक्त ठरली आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावरील जनाहारचे पूर्वीपासूनच वेगळे महत्त्व राहिले आहे. पूर्वी रेल्वे प्रशासनाकडूनच जनाहारही संचालित केले जात होते. परंतु, नागपूर स्थानकावरील बेसकिचनचा ताबा आयआरसीटीसीने घेतल्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी जनाहारचे खासगीकरण करण्यात आले. तेव्हापासून खाद्य पदार्थांची गुणवत्ता आणि शुल्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

येथून खाद्यपदार्थांची सर्रास चढ्या दराने विक्री होत असल्याचे वारंवार पुढे आले. शिवाय गरीब प्रवाशांकडून मोठी मागणी असूनही जनता खाना उपलब्ध करून दिले जात नसल्याच्याही तक्रारी होत्या. अलिकडेच खराब झालेले अन्न उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून जनाहारला सिल ठोकून कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली होती. आता कंत्राटच संपल्याने पुन्हा एकदा जनाहारला कुलूप लावण्यात आले आहे.

आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय जनाहार सुरू होणे नाही. यासाठी जवळपास १० ते १५ दिवसांचा अवधी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे गरीब प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे. जनाहार पुन्हा सुरू होण्यासाठी जवळपास १० ते १५ दिवसांचा अवधी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.